

रांगीत दिवाळी पाडव्याला कुस्त्यांचा आखाडा रंगला; ४५ बालमल्लांनी दाखविले कौशल्य
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि.१३ : तालुक्यातील नविरांगी येथे दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आयोजित बालकांच्या कुस्ती स्पर्धेत चिमुकल्या मल्लांनी आपल्या डावपेचांनी उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत सुमारे ४० ते ४५ कुस्त्यांचे सामने रंगले. बालमल्लांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आखाड्यात चांगलाच उत्साह पाहायला मिळाला.
ग्रामीण भागातील पारंपरिक कुस्ती संस्कृती जपण्यासह लहान मुलांमध्ये कुस्तीची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या बालमल्लांना रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन दिवाकर भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य जयंतकुमार काटेंगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक विनायक पोहनकर, केंद्रप्रमुख संदीप जुवारे, शिक्षक भास्कर भोयर, धानोरा पोलीस ठाण्याचे मेजर जगदीश कन्नाके, रांगीचे माजी उपसरपंच नरेंद्र भुरसे, नंदू कुनघाटकर आणि विलास बोगा उपस्थित होते.
यावेळी गावातील नागरिक, युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आयोजित या स्पर्धेमुळे गावातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.












