पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट प्रयास अंतर्गत वीर बाबुराव शेडमाके सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन

117

– १०५ आश्रमशाळेमधुन २३, ६३६ विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, २२ नोव्हेंबर : नक्षल प्रभावित अतिसंवेदनशिल गडचिरोली जिल्ह्याचा लोकशाही व शांततेच्या मार्गाने विकास साधण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने विविध नाविण्यपुर्ण उपक्रम राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणुन गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात कार्यरत असलेल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीने तसेच शिक्षणासोबतच बौद्धीक कलागुणांना वाव मिळावा व शालेय जीवनपासूनच स्पर्धा परीक्षांकडे कल वाढावा यासाठी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन प्रोजेक्ट प्रयास (Police Reaching Out to Youths & Students) या उपक्रमांतर्गत वीर बाबुराव शेडमाके सामान्यज्ञान स्पर्धा पार पडली.

सदर प्रयास उपक्रम ०३ ऑगस्ट २०२२ पासून सुरू करण्यात आला होता. यामध्ये जिल्ह्यातील १०५ आश्रमशाळा सहभागी झाल्या होत्या. याकरीता प्रत्येक आश्रम शाळेतील एक समन्वय शिक्षक व ती आश्रमशाळा ज्या पोस्टे / उपपोस्टे / पोमकें हद्दीमध्ये येते तेथील एक समन्वय अधिकारी व्हॉटस्अप ग्रुपमध्ये ऍड करून आश्रमशाळांना व्हॉटस्अप द्वारे रोज १० प्रश्न पाठविण्यात येवून आश्रमशाळेतील समन्वय शिक्षक दैनंदिन परिपाठामध्ये प्रार्थनेच्यावेळी मुलांना प्रश्न विचारून व त्यानंतर त्यांची उत्तरे स्पष्टीकरणासह सांगुन ते शाळेतील नोटीस बोर्डवर लावण्यात येत होते. आत्तापर्यंत सामान्य ज्ञानावरील आधारीत ४२ प्रश्नपत्रिका ग्रुपवर पाठविण्यात आले असून, त्याप्रश्नांवर आधारीत ५० गुणांची परीक्षा २२ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वा. जिल्ह्यातील प्रयास उपक्रमांतर्गत असणाऱ्या १०५ आश्रमशाळेत घेण्यात आली. सदर परीक्षेत जिल्ह्यातील सर्व आश्रम शाळेतील २३,६३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असुन परीक्षेत गुणवत्तापुर्ण आलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम ५,०००/-, द्वितीय ३,०००/-, तृतिय २,०००/-, चतुर्थ १,५००/- व पाचवे १,०००/- रोख पारितोषिक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र व त्यापुढील ०१ ते २५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५००/- रु. रोख व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी गडचिरोली येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील परीक्षा केंद्रास भेट देवुन पाहणी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सदर परीक्षा मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकल्प अधिकारी कार्यालय गडचिरोली/ अहेरी/ भामरागड, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी याचे सहकार्याने पार पडली.

सदर उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता सर्व प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन / उपपोलीस स्टेशन / पोलीस मदत केंद्र, सर्व समन्वय अधिकारी पोलीस स्टेशन / उपपोलीस स्टेशन / पोलीस मदत केंद्र व सर्व आश्रमशाळेतील समन्वय शिक्षक तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, पोउपनि धनंजय पाटिल व सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here