देसाईगंज येथील शिबिराला ४६ रुग्णांनी दिली भेट

139

– नगरपरिषद व मुक्तिपथचा संयुक्त उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली : देसाईगंज शहरातील मातावार्ड येथील सभागृहात नगरपरिषद व मुक्तिपथ अभियानाच्या संयुक्त विद्यमाने २८ जून रोजी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील एकूण ४६ रुग्णांनी भेट दिली.
ज्या रुग्णांना रोज पिण्याची सवय आहे किंवा दारूच्या व्यसनामुळे आता त्रास जाणवत आहे अशा रुग्णांना शहरात मोफत उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यासाठी देसाईगंज नगरपरिषद व मुक्तिपथ अभियानाने पुढाकार घेतला. तसेच शहरातील वॉर्डावॉर्डात व्यसन उपचार शिबिराबाबत घंटागाडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. शहरातील कंपन्यांमध्ये, राईसमीलला भेट देऊन मजूर वर्गाला उपचार घेण्यास प्रवृत्त करण्यात आले. सोबतच शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्टॉप अशा मुख्य ठिकाणी पोस्टर लावून नागरिकांना शिबिराची माहिती देण्यात आली. या शिबिरामध्ये एकूण ४६ रुग्णांनी नोंदणी केली. यापैकी १५ रुग्णांना सर्च येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले तर ३१ रुग्णांवर पूर्ण उपचार करण्यात आला. या उपक्रमासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा व कर्मचारी पूर्णवेळ उपस्थित होते.
दरम्यान, शिबिराला भेट दिलेल्या रुग्णांवर सर्चमधील प्रशिक्षित चमूंनी उपचार केला. दारूची सवय कशी लागते. शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, घटक आदींची माहिती देत समुपदेशन सुद्धा करण्यात आले. यावेळी मुक्तिपथ अभियानाचे संचालक तपोजे मुखर्जी, उपसंचालक संतोष सावळकर, सर्चचे सहसंचालक तुषार खोरगडे, प्रभाकर केळझरकर, प्रमोद कोटांगले, प्राजु गायकवाड, अक्षय आदी उपस्थित होते. शिबिरात रुग्णांची नोंदणी तालुका संघटिका भारती उपाध्ये व अनुप नंदगिरवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here