आबादी जागेवर ‘कोणाचा हक्क?’ अतिक्रमणामुळे धानोऱ्यात खळबळ

50

आबादी जागेवर ‘कोणाचा हक्क?’ अतिक्रमणामुळे धानोऱ्यात खळबळ
– महसूल–नगरपंचायत एकमेकांकडे बोट
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १४ : धानोरा शहरातील गावठाण (आबादी) म्हणून नोंद असलेल्या रोड-टच जागेवर झालेल्या अतिक्रमणामुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांनी प्रशासनाला थेट जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या या जागेवर काही व्यक्तींनी टीनाचे शेड उभारून ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
बगीच्या बाजूला असलेल्या या मोक्याच्या जागेवर अलीकडील काळात कुंपण घालणे, बांधकाम साहित्य टाकणे आणि तात्पुरती शेड उभारणे अशा हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित जागा गावाच्या विकासासाठी, सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी व सामुदायिक उपक्रमांसाठी राखीव असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र नियम धाब्यावर बसवून अतिक्रमण होत असल्याने संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात प्रशासनातील संभ्रम अधिकच गडद झाला आहे. महसूल विभागाकडे चौकशी केली असता संबंधित जागा नगरपंचायतीकडे वर्ग केल्याचे सांगण्यात आले. तर नगरपंचायत प्रशासनाने ही जागा अद्याप महसूल विभागाकडून हस्तांतरित झालेली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाच्या अधिकारात आहे आणि अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल उपस्थित होत आहे.
“आज अतिक्रमणाकडे दुर्लक्ष झाले, तर उद्या सार्वजनिक बांधकामांसाठी जागाच उरणार नाही,” अशी प्रतिक्रिया काही जागरूक नागरिकांनी व्यक्त केली. गावाच्या नियोजनबद्ध विकासावरच गदा येण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून महसुली नोंदी तपासाव्यात, अनधिकृत अतिक्रमण त्वरित हटवावे आणि जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता महसूल विभाग आणि नगरपंचायत यापैकी कोण पुढाकार घेऊन ठोस कारवाई करते, याकडे धानोरा वासीयांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here