‘मुख्यमंत्री पंचायत राज अभियान’ अंतर्गत मौशिखांबमध्ये सुसज्ज अभ्यासिका सुरू
– ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
The गडविश्व
ता. प्र / रांगी, दि. १४ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी दर्जेदार, शांत व शिस्तबद्ध अभ्यासाचे वातावरण उपलब्ध व्हावे या उद्देशाने गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब ग्रामपंचायतीने ‘मुख्यमंत्री पंचायत राज अभियान’ अंतर्गत सुसज्ज अभ्यासिका सुरू करून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय पाऊल उचलले आहे. या उपक्रमामुळे गावातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता गावातच अभ्यासासाठी स्वतंत्र व सुरक्षित जागा उपलब्ध झाली आहे.
नवीन अभ्यासिकेमध्ये बसण्याची प्रशस्त व्यवस्था, पुरेशी प्रकाशयोजना, पंखे तसेच आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शहरातील वाचनालयांचा लाभ घेता येत नाही, तर घरगुती अडचणींमुळे अभ्यासासाठी योग्य वातावरण मिळत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने पुढाकार घेत हा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अभ्यासिकेच्या शुभारंभप्रसंगी सरपंच सौ. रंजिता पेंदाम यांनी विद्यार्थ्यांना नियमितपणे अभ्यासिकेचा लाभ घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्याचे आवाहन केले. उपसरपंच सौ. रुपाली गांधरवार यांनी हा उपक्रम गावाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामविकास अधिकारी खुशाल नेवारे यांनी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, सुधाकर गेडाम तसेच तंटामुक्ती अध्यक्ष गणेश दहलकर उपस्थित होते. गणेश दहलकर यांनी विद्यार्थ्यांना सातत्य, शिस्त आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर यश मिळविण्याचा संदेश दिला.
गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातही अशा शैक्षणिक व विकासाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मौशिखांब ग्रामपंचायतीची ही पुढाकार ग्रामीण शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
#thegdv #thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














