The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : मूलचेरा तालुक्यातील शांतिग्राम येथे सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीच्या समस्येवर मात करीत आपल्या गावाला दारूविक्रीमुक्त करण्याचे यशस्वी प्रयत्न गावातील महिलांनी केले. यासाठी महिलांनी ग्रामपंचायत, पोलीस विभाग व ग्रामस्थांच्या मदतीने विविध कृती कार्यक्रम राबवून हे यश मिळविले.
मूलचेरा पासून 25 किमी अंतरावर असलेल्या शांतिग्राम येथे 1500 एवढी लोकसंख्या आहे. या गावात 20 वर्षांपासून अवैध दारूविक्री सुरू होती. दरम्यान, 2016 नंतर गावाच्या निर्णयातुन व मुक्तीपथ गाव संघटनेच्या माध्यमातून महिलांनी अवैध दारूविक्री विरोधात पुढाकार घेतला. परंतु, काही मुजोर विक्रेत्यांनी न जुमानता आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. परिणामी दारू पिणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. युवकांमध्ये सुद्धा व्यसनाचे प्रमाण वाढले. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावातील महिलांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. अशातच दारूविक्री बंदी असलेल्या गिताली या गावातील महिलांच्या सहकार्याने दारूविक्री बंदीसाठी लढा सुरू करण्यात आला.
गावातील अवैध दारू हद्दपार करण्यासाठी दोन्ही गावातील महिलांनी संयुक्तरित्या ग्रामपंचायत च्या सहकार्याने 29 जानेवारी 2024 ला महिला ग्रामसभा घेतली. यावेळी दारुबंदी या विषयावर मुक्तीपथ तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, गावातील सर्व महिला व पुरुषांनी गावामध्ये दारूबंदीचा निर्णय घेतला. सोबतच मुक्तीपथ गाव संघटना पूनर्गठीत करण्यात आली. त्यांनतर ग्रामपंचायत मध्ये दारूबंदीसाठी ठराव पारित करण्यात आले. यामध्ये दारूविक्रेत्यांकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करणे, ग्रामपंचायत दाखल्यांपासून वंचीत ठेवणे, कोणत्याही कार्यक्रमात दारू विक्रेत्यांना सहभागी करणार नाही या निर्णयाचा समावेश होता. या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी गावातील महिलांनी रॅली काढून 12 दारूविक्रेत्याना अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्याचे आवाहन केले. एवढ्यावरच न थांबता महिलांनी गावापासून जवळपास 5 किमी अंतरावर असलेल्या जंगलपरिसरात शोधमोहीम राबवून दारूविक्रेत्यांचे अड्डे व 21 ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट केला. तसेच शांतिग्राम येथील विक्रेता नजीकच्या दामपूर येथे अवैध व्यवसाय करीत होता. याबाबतची माहिती मिळताच महिलांनी अहेरी पोलिसांच्या सहकार्याने संबंधित दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून गावातून अवैध दारू हद्दपार झाली असून निर्णयाचे उल्लंघन होऊ नये यासाठी आताही महिला सक्रिय आहेत. दारूविक्री बंदी असल्याने गावातील व्यसनाचे प्रमाण घटले असून महिलांनी आपल्या गावाला दारूच्या मोठ्या समस्येतून मुक्त केले आहे.

(#thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )