– पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर घडली घटना, आरोपीस केली अटक
The गडविश्व
गडचिरोली दि.२७ : येथील भुमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यावर जुन्या वादाचा राग मनात धरून ठेवून दिवसाढवळ्या चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवार २७ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहरातील टी पॉईंट चौकात घडली. सौरभ ताटिवर (वय २६ ) रा. गडचिरोली असे हल्ला करणाऱ्याचे नाव असून दिनेश काकडे (वय २५) मु.पो.ता. मानवत जि. परभनी (हल्ली मुक्काम गडचिरोली) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिनेश काकडे हे गडचिरोली भूमिअभिलेख कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत आहेत. तर आरोपी सौरभ ताटिवर याची आई सुद्धा भूमिअभिलेख कार्यालयात शिपाई असून काही दिवसांपूर्वी कार्यालय परिसरात आरोपी सौरभ ने भांडण केल्याने त्यावेळी दिनेश काकडे यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तोच राग मनात धरून दिनेश काकडे हे टी पॉइंट चौकात जेवण करीत असताना त्यांच्यावर सौरभ ने चाकूने गळ्यावर वार करीत गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ झालेल्या दिनेश काकडे यांना लागलीच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले तर आरोपी सौरभ ताटिवर यास पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश काकडे यांची प्रकृती धोक्याबाहेर असून पुढील उपचार सुरू आहे. घटनेच्यावेळी आरोपी हा नशेत असल्याचे कळते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #crimenews #tpoint)