– कर्मचारी व जनतेचे हाल
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २७ : तालुक्यातील मुरूमगाव येथे मागील १२ ते १३ वर्षापूर्वी महसूल मंडळ कार्यालया करिता इमारत बांधण्यात आले. मात्र सदर इमारतीला कोणत्याही पद्धतीचा विद्युत पुरवठा नसल्याने विद्युत पुरवठ्या अभावी इमारत ओस पडली असली तरी याचा नाहक त्रास कर्मचाऱ्यांना व परिसरातील लोकांना होत आहे.
नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात शासनाने करोडो रुपये खर्च करून मुरुमगाव येथे राजस्व अभियाना अंतर्गत महसूल मंडळाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. सदर इमारत सध्या कर्मचारी वापरत असून या इमारतीला कोणत्याही प्रकारचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला नसल्याने ईमारतीत कामा करिता येणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
आधीच अति दुर्गम भाग असून विजेचा मोठा त्रास गावकऱ्यासह परिसरातील लोकांना सोसावं लागत आहे. लाईट गेली तर ती परत येईल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. मुरूमगावचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असते. त्यातच शासनाने आता सर्व कामे ऑनलाईन केल्याने इमारतीत विद्युत पुरवठा नसल्याने कामा करिता येणाऱ्या लोकांना आल्या हाती परतावे लागते. मागील तेरा वर्षापासून राजस्व विभागाच्या या इमारतीची अवस्था तशीच असल्याने विद्युत पुरवठ्या अभावी ही इमारत ओस पडल्याचे पाहायला मिळते. मात्र याकडे कोणत्याही अधिकाऱ्यांचे लक्ष जात नाही आणि कोणताही पक्षाचे पदाधिकारी ओरडताना दिसत नाहीत.
मागील महिन्यात सदर इमारतीचे दुरुस्तीचे काम करण्यात आले तेही निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येते. मुरूमगाव येथील मंडळ अधिकाऱ्यासह सर्वच कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याची ओरड गावकऱ्यांची आहे. आठवड्यातील दोन दिवस सेवा देतात त्यानंतर आजूबाजूच्या अतिदुर्ग डोंगराळ भागामध्ये अधिकारी दौरा दाखवितात पण प्रत्यक्षात कोणत्याही पद्धतीचा दौरा करीत नाहीत. मुख्यालयी कोणतेही कर्मचारी राहत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना वेळोवेळी सातबारा मिळत नाही व इतर काम करिता आठ – आठ दिवस वाट पाहत राहावे लागते. मंडळ अधिकाऱ्याचे तलाठी व कोतवाल यांच्यावर नियंत्रण नसल्याचे दिसून येते. महसूल मंडळ कार्यालयाला नियमित विद्युत पुरवठा करून देण्यात यावे तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहावे अशी मागणी मुरुम गाव येथील गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora #murumgao)