घुग्घुस भूस्खलन बाधित ‘त्या’ १६९ कुटुंबाना मिळणार हक्काचा निवारा

198

-भूस्खलन बाधित कुटुंबियांना पालकमंत्र्यांचा दिलासा
– जागा उपलब्ध करुन देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
The गडविश्व
चंद्रपूर, १४ फेब्रुवारी : घुग्घुस येथील आमराई वॉर्डात मागील वर्षी झालेल्या भूस्खलनाच्या घटनेनंतर स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे दिलासा मिळणार आहे; बाधित कुटुंबीयांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यात याव्या अशा सूचना ना मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
२६ ऑगस्ट २०२२ मध्ये घुग्घुस येथील आमराई वॉर्डात भूस्खलनाची घटना घडली होती. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही; परिसरातील कोळसा खाणीमुळे या परिसरातील अनेक घरांना भुस्खलनाचा धोका कायम राहत असल्यामुळे १६९ कुटुंबे इतरत्र स्थलांतरित करण्यात आली होती. आता या कुटुंबाना हक्काचा निवारा मिळण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला असून सदर कुटुंबांना जागा उपलब्ध करून देण्याच्या सुचना जिल्हाधिका-यांना दिल्या आहे.
घुग्घुस येथील भूस्खलन पिडीत कुटुंबाच्या पुनर्वसनाचा आढावा पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृह येथे घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी मरुगनांथम एम.,माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.
गत सहा महिन्यात पिडीत कुटुंबियांच्या राहण्याची व्यवस्था इतरत्र करण्यात आली असली तरी घरभाड्याकरीता देण्यात आलेली रक्कम संपली आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांची घर भाड्याची रक्कम वेकोलीने सदर कुटुंबियांना त्वरित द्यावी. रक्कम देण्यास टाळाटाळ केली तर प्रशासनाने कंपनीचे काम त्वरीत बंद करावे. तसेच १६९ पिडीत कुटुंबियांसाठी जिल्हा प्रशासनाने घरासाठी जागा निश्चित करून त्या ले-आऊट मध्ये रस्ता, वीज, पाणी आदींची सुविधा उपलब्ध करून देणे. त्या १६९ कुटुंबाची आदर्श नगरी तयार होईल, याबाबत नियोजन करावे. विशेष म्हणजे यापैकी किती कुटुंब रमाई आवास, शबरी आवास, महाप्रीत योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरकुल योजनेसाठी पात्र आहेत, ते तपासावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
यापूर्वी घटना घडल्यानंतर आठ दिवसांच्या आत पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रती कुटुंबाला १० हजार रुपयांची आर्थिक मदत व जीवनावश्यक वस्तुंची किट देण्यात आली होती.
बैठकीला विवेक बोडे, निरीक्षण तांड्रा, संतोष मुन्ने, तुळशीदास धवस, श्रीकांत सावे, श्रीमती कारले, शिला उईके, माया चरके, साधना कांबळे व पिडीत कुटुंबाचे सदस्य उपस्थित होते.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Valentine’s Day gifts) (Valentine’s Day) (PSG vs Bayern) (Liverpool vs Everton) (Super Bowl) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (Chandrpur News updates) (Sudhir Mungantiwar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here