१ फेब्रुवारी पासून आदिवासी आश्रम शाळांमध्ये होणार नवा बदल

963

– आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची माहिती
– शाळा आता सकाळी ११ वाजतपासून होणार सुरू
The गडविश्व
गडचिरोली दि.२३ : आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळांमध्ये नवा बदल होणार असून शाळेच्या वेळेत 1 फेब्रुवारीपासून बदल होणार आहे. आता शाळा सकाळी ११ वाजेपासून सुरू होतील, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर असताना दिली.
धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय माध्यमिक कन्या आश्रम शाळेत आयोजित आदिवासी पालक व लाभार्थी मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आदिवासी विकास विभाग नागपूरचे सहआयुक्त दिगांबर चव्हाण, सरपंच पूनम किरंगे, तसेच प्रकल्प अधिकारी राहुल मीना (गडचिरोली), नमन गोयल (भामरागड), कुशल जैन (अहेरी) व अन्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र गरिबांच्या कल्याण आणि विकासासाठी वाटचाल करीत आहे, त्यांचेसोबत राज्याचा आदिवासी विकास विभाग देखील भरारी घेईल, याबाबत मी आपणास आश्वस्त करतो असे त्यांनी सांगितले. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व आश्रम शाळा तसेच वसतिगृहांमध्ये आवश्यक सुविधांसाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री डॉ. उईके यांनी ७ फेब्रुवारी रोजी विविध शाळांमध्ये अधिकाऱ्यांचा मुक्काम होईल, असे जाहीर करताना प्रकल्प अधिकाऱ्यांना स्वायत्त निर्णय घेण्यासाठी सर्वाधिकार देण्याचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल, असेही सांगितले. “एकही आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहणार नाही, यासाठी अधिकाधिक शाळा व वसतिगृहे उभारण्यात येतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी व पालकांनी मनोगत व्यक्त केले. तसेच विविध योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आर्थिक मदतीमुळे व्यवसाय सुरू करून रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल आदिवासी विकास विभागाचे आभार व्यक्त केले. तसेच घरकुलाची रक्कम वाढविण्याचीही मागणी केली. यावेळी शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या वित्तीय सहाय्याचे व जात प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी राहुल मीना यांनी केले.
मेळाव्याला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #ashokuikey #gadchirolilocalnews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here