वेळीच मिळालेल्या क्रिटिकल केअरमुळे महिलेचे प्राण वाचले
– हेडरीतील लॉईड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलचा उल्लेखनीय वैद्यकीय यश
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : दुर्गम आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातही अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा व वेळेवर उपचार किती महत्त्वाचे ठरू शकतात, याचे ठोस उदाहरण हेडरी येथील लॉईड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नुकतेच पाहायला मिळाले. पारसलगुंडी गावातील एका मध्यमवयीन महिलेचे ऑर्गेनोफॉस्फरस विषबाधेमुळे अत्यवस्थ अवस्थेत असताना वेळेवर व प्रगत क्रिटिकल केअर देऊन डॉक्टरांनी तिचे प्राण वाचवले.
२८ डिसेंबर २०२५ रोजी ही महिला बेशुद्ध अवस्थेत, तीव्र श्वसनास त्रास व फुफ्फुसांमध्ये गंभीर गुंतागुंत निर्माण झाल्याने रुग्णालयात दाखल झाली. तपासणीनंतर डॉक्टरांनी ऑर्गेनोफॉस्फरस विषबाधेचे निदान करत तात्काळ आपत्कालीन जीवनरक्षक उपचार सुरू केले. रुग्णाची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने तिला इंट्यूबेट करून आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले व मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दीर्घकाळ व्हेंटिलेटरवर राहावे लागल्यामुळे पुढे ट्रॅकिओस्टॉमी करण्यात आली.
सलग १५ दिवस आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना विषबाधेचे दुष्परिणाम मेंदू, हृदय व फुफ्फुसांवर दिसून आले. तिला तीव्र फुफ्फुसातील सूज (ॲक्यूट पल्मोनरी एडिमा) झाली तसेच सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया (SVT) चे दोन झटके आले. त्यामुळे रुग्णाची प्रकृती अधिकच गंभीर बनली. या संपूर्ण कालावधीत सतत निरीक्षण, आधुनिक उपकरणे व प्रगत क्रिटिकल केअर देणे आवश्यक होते.
सर्व गुंतागुंतींवर मात करत रुग्णाने हळूहळू उपचारांना प्रतिसाद दिला. बहुवैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयित आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर तिला सुरक्षितरीत्या व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर सर्व जीवनसत्त्वे सामान्य असलेल्या अवस्थेत तिला घरी सोडण्यात आले.
या उपचारांचे नेतृत्व मेडिसिन तज्ज्ञ डॉ. चेतन, भूलतज्ज्ञ डॉ. धीरज आणि ईएनटी तज्ज्ञ डॉ. महेंद्र यांनी केले. संपूर्ण उपचार प्रक्रियेचे समन्वय वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाल रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
रुग्णालय प्रशासनाने गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात अत्याधुनिक क्रिटिकल केअर सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांचे आभार मानले. तसेच संचालिका कीर्ती रेड्डी यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
वेळीच उपचार, आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि टीमवर्क यांच्या बळावर दुर्गम भागातही गंभीर रुग्णांचे प्राण वाचवता येतात, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews













