गडचिरोलीत अभाविपच्या ५४व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाच्या पोस्टरचे दिमाखात अनावरण

119

गडचिरोलीत अभाविपच्या ५४व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाच्या पोस्टरचे दिमाखात अनावरण
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : तरुणाईला दिशा देणारे व नेतृत्व घडविण्याचे कार्य करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) ५४ वे विदर्भ प्रांत अधिवेशन येत्या ९ ते ११ जानेवारी दरम्यान गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे. या बहुप्रतीक्षित अधिवेशनाच्या अधिकृत पोस्टरचे अनावरण गडचिरोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या प्रसंगी राष्ट्रीय मंत्री पायल किनाके, पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री गीतेश चव्हाण, प्रांत संघटन मंत्री विक्रमजित कलाने, प्रांत सहसंघटन मंत्री मनोज साबळे, प्रांत कार्यालय मंत्री महेश डोकरीमारे, गडचिरोली विभाग संघटन मंत्री राहुल शामकुवर तसेच गडचिरोली नगर मंत्री संकेत मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असून, यावर्षी देशभरात ७६,९८,४४८ विद्यार्थ्यांची सदस्य नोंदणी करून अभाविपने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी-युवक एकत्र येऊन शैक्षणिक, सामाजिक व युवा प्रश्नांवर मंथन करणार आहेत.
अधिवेशनात विविध समस्यांवर विद्यार्थ्यांची मते जाणून घेऊन त्यावर उपाययोजना सुचविणारे ठराव मंजूर केले जाणार आहेत. यासोबतच भव्य शोभायात्रेद्वारे युवा नेतृत्वाला आपले विचार मांडण्याची संधी मिळणार असून, प्रांताच्या नूतन कार्यकारिणीची निवडही याच अधिवेशनात होणार आहे.
गडचिरोलीत होणारे हे अधिवेशन विदर्भातील विद्यार्थी चळवळीला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here