लघु व मध्यम उद्योगांना गडचिरोलीत सुवर्णसंधी ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन

74

लघु व मध्यम उद्योगांना गडचिरोलीत सुवर्णसंधी ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याचा पायाभूत विकास वेगाने साध्य होऊ शकतो आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले. जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी उपलब्ध असलेल्या व्यापक संधींचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी नवोद्योगक व उद्योजकांना केले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली बँक ऑफ इंडिया, नागपूर यांच्या वतीने आयोजित एमएसएमई क्षमतानिर्मिती कार्यशाळा आज आर. के. सेलेब्रेशन हॉल, आरमोरी रोड, गडचिरोली येथे उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचा उद्देश जिल्ह्यात उद्योगवाढीस पोषक वातावरण निर्माण करणे, बँकिंग सुविधा, शासकीय योजना, तंत्रज्ञान व बाजारपेठेतील संधींबाबत नवोद्योगकांना सखोल मार्गदर्शन करणे हा होता.
जिल्हाधिकारी पंडा यांनी भाषणात गडचिरोलीतील नैसर्गिक संसाधने, कृषी व वनउत्पादनांवर आधारित उद्योग, शिल्पकला, प्रक्रिया उद्योग तसेच नवोद्योगांसाठी उपलब्ध असलेल्या संधी अधोरेखित केल्या. रस्ते, वीज, पाणी व औद्योगिक सुविधांच्या विकासासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून त्याचा थेट लाभ उद्योग क्षेत्राला होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमएसएमई उभारणीत बँकिंग क्षेत्राची भूमिका निर्णायक असल्याचे सांगत नवोद्योगकांना अधिकाधिक वित्तीय सहाय्य देण्याचे आवाहन त्यांनी बँकांना केले.
कार्यक्रमास सचिन शेंडे (क्षेत्रीय संचालक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नागपूर), जय नारायण (आंचलिक प्रबंधक, बँक ऑफ इंडिया), अंजना शामनाथ (उपमहाप्रबंधक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया), निलेश गायकवाड (महाप्रबंधक, जिल्हा उद्योग केंद्र), भास्कर जाधव (क्षेत्रीय प्रबंधक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, चंद्रपूर) यांच्यासह बँक ऑफ बडोदा व अन्य बँकांचे प्रतिनिधी, सार्वजनिक उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नागपूरचे क्षेत्रीय संचालक सचिन शेंडे यांनी उद्योग क्षेत्राच्या पायाभूत विकासासाठी आर्थिक नियोजनाचे महत्त्व विशद केले. बँक ऑफ इंडियाचे आंचलिक प्रबंधक जय नारायण यांनी प्रास्ताविकात परिश्रम, ज्ञान व सातत्य यांच्या बळावर एमएसएमई क्षेत्रातून रोजगारनिर्मिती व संसाधननिर्मिती साध्य होऊ शकते, असे नमूद केले.
कार्यशाळेत जिल्ह्याचा क्षमता विकास, बँकिंग संज्ञा व योजना, जागतिक बाजारपेठेतील संधी, वीज व तंत्रज्ञान, तसेच एमएसएमईसाठीच्या शासकीय योजनांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील कंत्राटदार, दुर्गम वनवासी भागातील शिल्पकार, राईस मिलसह विविध औद्योगिक क्षेत्रांचे प्रतिनिधी आणि बँक ऑफ इंडिया अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आर-सेटी प्रकल्पाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या उपमहाप्रबंधक अंजना शामनाथ यांनी नवोद्योगकांनी पुढे येऊन नवीन उद्योग सुरू करावेत, असे आवाहन करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here