संत गाडगे महाराजांना स्वच्छतेतून श्रद्धांजली ; जि. प. हायस्कूल धानोरा येथे पुण्यतिथी उत्साहात साजरी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २४ : धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात 20 डिसेंबर 2025 रोजी थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी उत्साह व श्रद्धेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
संत गाडगे महाराज यांच्या विचारांना कृतीची जोड देत पुण्यतिथीनिमित्त विद्यालयात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. “स्वच्छता हीच खरी सेवा” या ब्रीदवाक्यानुसार विद्यार्थ्यांनी शाळा परिसर, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. स्वच्छतेतूनच गाडगे महाराजांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एम. सुरजुसे होते. प्रमुख अतिथी म्हणून वेणूताई मशाखेत्री (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), जमीर कुरेशी (उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), संजय कुंडू (नगरसेवक, नगरपंचायत धानोरा) तसेच पी. व्ही. साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विज्ञान प्रदर्शनात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. स्वच्छता अभियानाचे नियोजन पी. बी. तोटावार यांच्या पुढाकाराने, तर क्रीडा शिक्षक ओम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशमुखे मॅडम यांनी केले, तर आभार एम. एल. देवकात्ते यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. संत गाडगे महाराजांच्या विचारांचा वारसा जपत विद्यार्थ्यांनी स्वच्छतेतून सामाजिक प्रबोधनाचा आदर्श घालून दिला.













