गडचिरोलीत आदिवासी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
– शाळेच्या निष्काळजीपणाविरोधात आम आदमी पार्टी आक्रमक
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : गडचिरोली प्रकल्पातील १० आदिवासी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध आम आदमी पार्टीने नोंदवला आहे. जिल्हा सचिव अमृत मेहर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
ज्ञानदीप कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज, शितलवाडी (रामटेक, नागपूर) येथे इतर जिल्ह्यातील एका मुलावर घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे शाळा प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या घटनेच्या अवघ्या दोन दिवस आधी पालकांनी शाळा सभेत त्रासाबाबत तक्रार नोंदवूनही प्रशासनाने ती डावलली होती. त्यामुळे आदिवासी पालकांमध्ये तीव्र संताप आणि भीती निर्माण झाली आहे.
अमृत मेहर यांनी यावेळी सांगितले की, गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील आदिवासी मुलींना शासनाच्या योजनेंतर्गत शिक्षण दिले जाते, मात्र शाळा व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे त्यांच्या सुरक्षिततेशी खिलवाड होत आहे. इतर जिल्ह्यातील मुलावर झालेला लैंगिक अत्याचार हेच शाळेच्या असुरक्षित वातावरणाचे ठोस उदाहरण आहे. पालकांनी तक्रार नोंदवूनही शाळा प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही, ही बाब गंभीर असून जबाबदारांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
या घटनेनंतर पालकांनी आपल्या मुलींना शाळेत ठेवण्यास नकार दिला असून त्यांनी टीसीची मागणी केली आहे. शाळा सुरक्षित नसल्याचे स्पष्ट नमूद करून पालकांनी अर्ज सादर केला आहे. तरीही आदिवासी विकास विभागाने शाळा बदलण्याचा प्रस्ताव अमान्य केल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांचा आक्रोश वाढला आहे. या संदर्भात प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांनी चौकशीसाठी अपर आयुक्तांना पत्र दिले असले तरी शासनाने नियमांचा हवाला देऊन निर्णय पुढे ढकलल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
आम आदमी पार्टीने निवेदनातून तात्काळ चौकशी, जबाबदार शाळा प्रशासनावर कारवाई, आदिवासी मुलींचे सुरक्षित शाळेत समायोजन, सुरक्षा निकषांचे पालन आणि पालकांच्या तक्रारींची सुनावणी यांसारख्या मागण्या केल्या आहेत. शासनाने या प्रकरणात तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर शांततापूर्ण आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनाला स्थानिक आदिवासी समाजाचा व्यापक पाठिंबा मिळत असून, गडचिरोलीतील पालकांनी मुलींच्या सुरक्षेबाबत शासनाने त्वरित निर्णायक भूमिका घ्यावी, अशी ठाम मागणी केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














