सतीनदीचा तुटलेला बंधारा अखेर पुनर्बांधणीच्या मार्गावर

71

सतीनदीचा तुटलेला बंधारा अखेर पुनर्बांधणीच्या मार्गावर
– चक्का जाम इशाऱ्याचा धसका, आंदोलन मागे
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०१ : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला सतीनदी पात्रातील सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळील बंधारा अखेर पुनर्बांधणीच्या मार्गावर आला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील नव्या पुलाच्या बांधकामादरम्यान फोडण्यात आलेल्या या बंधाऱ्याची पुनर्बांधणी आश्वासन असूनही लांबवली जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत होता. नगरपंचायत उपाध्यक्ष बबलूभाई हुसैनी यांनी १ जानेवारी रोजी चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन आणि संबंधित बांधकाम कंपनी खडबडून जागी झाली असून पुनर्बांधणीच्या कामाला जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नियोजित आंदोलन मागे घेण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने मागील वर्षी सतीनदीवर नव्या पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. या दरम्यान पुलालगत असलेल्या व शहराला नळाद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या विहिरीजवळील बंधाऱ्यात साठलेले पाणी अडथळा ठरत असल्याने बंधारा दोन्ही बाजूंनी फोडण्यात आला. काम पूर्ण होताच बंधाऱ्याची पुनर्बांधणी करून देण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले होते. मात्र पुलाचे काम पूर्ण होऊनही बंधाऱ्याच्या पुनर्बांधणीकडे कंपनीकडून दुर्लक्ष करण्यात येत होते.
बंधारा तुटल्याने विहिरीतील पाण्याची पातळी सातत्याने खालावत चालली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरपंचायत उपाध्यक्ष बबलूभाई हुसैनी यांच्या नेतृत्वात सतीनदी घाटावर चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास संबंधित कंपनीची बेजबाबदार कार्यप्रणाली जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला होता.
या आंदोलनाच्या इशाऱ्याचा धसका घेत प्रशासनाने तत्काळ संबंधित बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून तातडीने काम सुरू करण्याचे सक्त निर्देश दिले. त्यानुसार कंपनीचे अभियंता संदीप भैसारे यांनी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच सर्व आवश्यक बांधकाम साहित्य उपलब्ध करून प्रत्यक्ष पुनर्बांधणीच्या कामाला सुरुवात केली.
आज नगरपंचायत उपाध्यक्ष बबलूभाई हुसैनी, नगरसेवक जयेंद्रसिंह चंदेल आणि दामोदर उईके यांनी बांधकाम स्थळाला भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी दर्जेदार व टिकाऊ बांधकाम करण्याच्या स्पष्ट सूचना अभियंता संदीप भैसारे यांना देण्यात आल्या. नागरिकांचा संताप लक्षात घेता संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी बांधकाम स्थळी सशस्त्र पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
बंधाऱ्याच्या पुनर्बांधणीला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे अखेर कंपनीला काम सुरू करावे लागल्याची चर्चा नागरिकांत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here