देसाईगंज तालुक्यातील ‘ते’ तीन गाव झाले दारूविक्रीमुक्त

106

– शिवराजपूर गट ग्रामपंचायतचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या फरी, शिवराजपुर व उसेगाव या तिन्ही गावातील अवैध दारूविक्री पूर्णतः बंद करण्यात ग्रामपंचायत पदाधिकारी, गाव संघटन व मुक्तिपथ तालुका चमूला यश आले आहे. दारूविक्रीमुक्त ठरलेल्या या तिन्ही गावातील दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
शिवराजपूर हे गाव ३०००+ लोकवस्तीचे असून हे गट ग्रामपंचायत आहे. या अंतर्गत फरी, शिवराजपुर आणि उसेगाव या तीन गावांचा सहभाग आहे. पूर्वी शिवराजपूर येथे अवैध दारूविक्री सुरु होती. त्यानंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गावातून अवैध दारू हद्दपार केली. अशातच मागील निवडणुकीचे दरम्यान काही मुजोर विक्रेत्यांनी डोके वर काढत अवैध दारूचा व्यवसाय सुरु केला. यामुळे विविध समस्या पुढे येऊ लागल्यात. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच मे २०२३ ला ग्रामपंचायत शिवराजपुर ग्रामसभेत ठराव घेण्यात आला की, कोणत्याही दारू विक्रेत्याला शासकीय दाखले, कागदपत्र, योजना मिळणार नाही. तसेच निर्णयाचे उल्लंघन केल्यास पहिला दंड ५०००, दुसरा दंड दहा हजार व तिसरा दंड २० हजार असा दुपटीने दंड वाढेल आणि दंड न भरल्यास दंडाएवढी रकमेची वस्तू जप्ती पंचनामा करण्यात येईल असा ग्रामसभेचा ठराव घेण्यात आला. सोबतच भविष्यामध्ये कुठल्याही निवडणुकीदरम्यान सुद्धा गावामध्ये दारू विक्री होणार नाही असाही ठराव या ग्रामसभेने घेतला.
ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी करत ग्रामपंचायतचे सदस्य झिलपे आणि पोलीस पाटील हेमंत दर्वे यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार गावात सभा घेऊन गावातील दारू विक्री एक मार्चपासून बंद करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हे गाव दारू बंदच होते. सद्यस्थितीत ग्रामपंचायत शिवराजपुर अंतर्गत असलेले शिवराजपूर, फरी आणि उसेगाव हे तीनही गावात दारू विक्री बंद आहे. हि दारूबंदी कायम टिकून ठेवण्यासाठी गावातील तिन्ही गावाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ सतत मोर्चा बांधणी करीत आहेत. आगामी काळातही आपले गाव दारूविक्रीमुक्तच ठेवण्याचा निश्चय ग्रामस्थांनी केला आहे. यासाठी मुक्तिपथ चे तालुका संघटिका भारती उपाध्ये, स्पार्क कार्यकर्ती अर्चना मेक्कलवार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करीत विविध उपक्रम घेतले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #obc #desaiganj #muktipath )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here