‘पाहुणे आले की घर झाडायचे!’ व्हीआयपी दौऱ्याच्या निमित्ताने गडचिरोलीत अतिक्रमण हटाव मोहीम; नंतर पुन्हा जैसे थे?

4

‘पाहुणे आले की घर झाडायचे!’ व्हीआयपी दौऱ्याच्या निमित्ताने गडचिरोलीत अतिक्रमण हटाव मोहीम; नंतर पुन्हा जैसे थे?
– दोन दिवसांत प्रमुख मार्ग मोकळे; अतिक्रमणधारकांच्या रोजगाराचा प्रश्नही ऐरणीवर, सामान्य दिवसांत प्रशासनाला कारवाईचा मुहूर्त सापडत नाही का?
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : ‘पाहुणे आले की घर झाडायचे’ या म्हणीचा प्रत्यय सध्या गडचिरोली शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरून येत आहे. राज्यपालांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (व्हीआयपी) दौऱ्याची चाहूल लागताच शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासनाने धावपळ सुरू केली आहे. अवघ्या दोन दिवसांत प्रमुख मार्गांवरील फुटपाथ आणि सार्वजनिक जागा मोकळ्या करण्यात आल्या. मात्र, या कारवाईमुळे हातगाडीधारक आणि छोट्या व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्नही निर्माण झाला आहे. सामान्य दिवसांत अतिक्रमणांकडे दुर्लक्ष आणि व्हीआयपी दौऱ्याच्या वेळीच कारवाई, अशी प्रशासनाची भूमिका का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १७१ व्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव सेवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून शहरातील स्वच्छता, सुशोभीकरण आणि अतिक्रमण हटविण्याची कामे वेगाने सुरू आहेत. महामहीम राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने शहरातील प्रमुख मार्ग आणि सार्वजनिक ठिकाणे मोकळी करण्यावर प्रशासनाने विशेष भर दिला आहे.

याच मोहिमेचा भाग म्हणून बुधवारी पोटेगाव मार्गावरील फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. या ठिकाणी फुटपाथवर विविध प्रकारची अतिक्रमणे झाल्याने पादचाऱ्यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. अतिक्रमणे हटविल्यानंतर फुटपाथ मोकळा करण्यात आला असून परिसराची स्वच्छताही करण्यात आली. गुरुवारी धानोरा मार्गावरील बसस्थानकासमोरील अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजू मोकळ्या झाल्या असून वाहतुकीला अधिक जागा उपलब्ध झाली आहे.

फुटपाथ मोकळे झाले; पण रोजगाराचे काय?

अतिक्रमणांमुळे पादचारी आणि वाहनचालकांना होणारा त्रास लक्षात घेता रस्ते व फुटपाथ मोकळे करणे आवश्यक आहे. मात्र, या कारवाईमुळे हातगाडी लावून, छोटे स्टॉल उभारून किंवा फुटपाथच्या कडेला व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा राहिला आहे. अनेकांसाठी हा व्यवसायच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असतो. त्यामुळे अतिक्रमण हटविताना केवळ कारवाई न करता अशा व्यावसायिकांसाठी पर्यायी जागा किंवा योग्य पुनर्वसनाची व्यवस्था करण्याची गरज आहे. सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवणे आणि छोट्या व्यावसायिकांचा रोजगार सुरक्षित राखणे, या दोन्ही बाबींचा समतोल प्रशासनाने साधणे अपेक्षित आहे.

दौरा संपताच पुन्हा अतिक्रमणांचे साम्राज्य?

शहरातील अतिक्रमणांची समस्या काही एका-दोन दिवसांतील नाही. फुटपाथवर दुकाने, हातगाड्या आणि इतर प्रकारची अतिक्रमणे झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते, तर वाहतुकीलाही अडथळे निर्माण होतात. अशा परिस्थितीत नियमित कारवाई करण्याऐवजी व्हीआयपी दौऱ्याच्या वेळीच प्रशासनाला अतिक्रमण हटविण्याची आठवण का होते? दौरा संपल्यानंतर पुन्हा त्याच जागांवर अतिक्रमणे उभी राहिली तर या मोहिमेचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहर अतिक्रमणमुक्त आणि स्वच्छ ठेवणे ही केवळ व्हीआयपी दौऱ्यापुरती जबाबदारी नसून नागरिकांच्या दैनंदिन सोयीसाठी आवश्यक बाब आहे. त्यामुळे ही मोहीम नियमितपणे सुरू ठेवण्यासोबतच छोट्या व्यावसायिकांच्या रोजगाराचा विचार करून पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे. अन्यथा एका बाजूला फुटपाथ मोकळे होतील पण दुसऱ्या बाजूला अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कायम राहील. आता राज्यपालांचा दौरा आटोपल्यानंतरही फुटपाथ मोकळे राहणार की पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होणार, याकडे गडचिरोलीकरांचे लक्ष लागले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #EncroachmentDrive #AntiEncroachmentCampaign #VIPVisit #GadchiroliNews #StreetVendors #EmploymentIssue #FootpathEncroachment #PublicIssues #DistrictAdministration #UrbanDevelopment #MaharashtraNews #TheGadvishva #TheGDV

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here