कोरची आश्रमशाळेत सिकलसेल जनजागृती सप्ताह ; विद्यार्थ्यांची तपासणी व समुपदेशन
– उपविभागीय रुग्णालयाचा स्तुत्य पुढाकार
The गडविश्व
ता.प्र / कोरची, दि. १२ : उपविभागीय रुग्णालय, कुरखेडा यांच्या वतीने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, कोरची येथे ११ ते १८ डिसेंबर २०२५ दरम्यान सिकलसेल जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, मार्गदर्शन आणि समुपदेशनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडत आहे. आश्रमशाळेच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सिकलसेल या आनुवंशिक रक्तविकाराबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रशांत देशमुख (एम.ओ.) यांनी सांगितले की सिकलसेल हा पूर्णतः आनुवंशिक आजार असून सामान्य गोलाकार लाल रक्तपेशी विळ्यासारख्या आकारात वाकड्या होतात. या विळ्यासारख्या पेशी रक्तवाहिन्यांमध्ये अडकून तीव्र वेदना, अवयवांवर ताण आणि गंभीर गुंतागुंत निर्माण करतात. योग्य तपासणी, नियमित उपचार आणि समुपदेशनाद्वारे या आजाराचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात नियंत्रित करता येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सप्ताहादरम्यान आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक भैयालाल कुरसंगे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शनासाठी डॉ. स्नेहा कृपाल (एम.ओ.), परिचारिका वर्षा दुमाने, फार्मासिस्ट हेमंत बोरकर, तसेच प्रा. हरेश कामडी, प्रा. अभिमन्यू वाटगुरे, प्रा. प्रमोद शंभरकर, प्रा. मनोज गजभिये, प्रा. अरुण कायंदे, प्रा. राहूल अंधारे, गुरुराज मेंढे, डाकराम ठाकरे, दिशा कोवे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुषमा अंबोणे यांनी केले. इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जनजागृती उपक्रमाचा लाभ घेतला. सिकलसेलविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याचा उपविभागीय रुग्णालयाचा हा उपक्रम स्तुत्य असून तो १८ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.













