दुर्गम कोरचीची नागपूर बस सेवा इतिहासजमा; ‘विकास’ फक्त कागदावरच?

131

दुर्गम कोरचीची नागपूर बस सेवा इतिहासजमा; ‘विकास’ फक्त कागदावरच?
— नागरिकांची बोचरी टीका, हिवाळी अधिवेशनात मुद्दा मांडला जाणार का?
The गडविश्व
ता.प्र / कोरची-कुरखेडा, दि. १३ : गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम, डोंगराळ आणि छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कोरची तालुक्यातील नागपूर-कोरची बस सेवा अनेक वर्षांपासून पूर्णपणे बंद आहे. जिल्ह्याला थेट नागपूरशी जोडणारी ही एकमेव महत्त्वाची वाहतूक लिंक ठप्प झाल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनात प्रचंड अडथळे निर्माण झाले आहेत.
कुरखेडा–वडसा–ब्रम्हपुरी मार्गे नियमित धावणारी ही बस सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता थांबविण्यात आली, आणि त्यानंतर ती पुन्हा सुरू न झाल्याने हजारो नागरिकांची मोठी ससेहोलपट होत आहे.
नागपूर, ब्रम्हपुरी किंवा वडसा येथे उपचार, शिक्षण, नोकरी, बाजारपेठेची कामे किंवा सरकारी कार्यालयीन कामांसाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. प्रवासाचा तिपटीने वाढलेला खर्च, वाहनांची कमी उपलब्धता आणि दुर्गम रस्त्यांवरील जोखीम यामुळे सामान्य नागरिकांचे हाल अत्यंत वाढले आहेत. अनेक वेळा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत कोरचीतील रुग्णांना वेळेत मोठ्या दवाखान्यात पोहोचविणे कठीण होते, ज्यामुळे जीव धोक्यात येण्याची भीती कायम आहे. गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांचे हाल तर अधिकच बिकट झाले आहेत.

विद्यार्थी व नोकरदार वर्गही या परिस्थितीचा मोठ्या प्रमाणावर बळी ठरत आहे. नागपूर व ब्रम्हपुरीतील महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर आठवड्याला घरी येणे अशक्य झाले आहे. तर नोकरीसाठी नागपूरला जाणाऱ्या युवकांना खासगी वाहनांवर अवलंबून रहाणे परवडत नसल्याने त्यांचे रोजगार धोक्यात येत आहेत. ‘मुलांचे शिक्षण आणि तरुणांचे भविष्य वाहतुकीअभावी अडखळत आहे,’ अशी चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.

या गंभीर प्रश्नावर शासन व स्थानिक लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचा आरोप नागरिकांकडून सतत केला जात आहे. अनेक निवेदने, तक्रारी, पाठपुरावा करूनही बससेवा सुरू करण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने जनतेचा संताप वाढत आहे. ‘विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला कोरचीसारख्या सीमावर्ती भागातील वस्तुस्थिती दिसत नाही का? आमच्यासाठी विकास म्हणजे फक्त कागदावरील घोषणा आहे,’ अशी बोचरी टीका नागरिकांनी केली.

दरम्यान नागपूर येथे महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन सुरू असताना कोरचीतील नागरिकांचे लक्ष विधानभवनाकडे लागले आहे. इतक्या मोठ्या समस्येचा प्रश्न लोकप्रतिनिधी अधिवेशनात मांडणार का, की हा मुद्दा पुन्हा वर्षभर धूळ खात पडणार, असा सवाल नागरिक करत आहेत. बससेवा बंद असल्याने संपूर्ण तालुक्याचे नागपूरशी असलेले संपर्क जाळे तुटले आहे. अशा स्थितीत विधानभवनात या प्रश्नावर ठोस चर्चा होऊन तातडीचा निर्णय निघावा, अशी सर्वसामान्यांची आशा आहे.

आदिवासीबहुल कोरची तालुक्यात रस्ते, आरोग्य, शिक्षण, वाहतूक यांसारख्या मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव जाणवत असताना नागपूर-कोरची बस सेवा पूर्ववत सुरू करणे हीच काळाची गरज आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #korchi #kurkheda #NagpurKorchiBusService #KorchiRegionIssues #GadchiroliNews #RuralConnectivity #PublicTransportFailure #WinterSessionNagpur #AdivasiRegionDevelopment #KorchiCitizensVoices #BasicFacilitiesCrisis #NagpurAssemblySession

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here