The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अलोणी शेतशिवारात शोधमोहीम राबवून जवळपास १ लाख ९ हजार रुपये किमतीचा १७ ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट केल्याची कृती गाव संघटना व धानोरा, गडचिरोली मुक्तिपथ तालुका चमूने केली.
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून ९ किमी अंतरावर अलोणी हे गाव आहे. या गावात अवैध दारूविक्रेते सक्रिय असून परिसरातील इतर गावांना नाहक त्रास होत आहे. या गावातील विक्रेत्यांवर पोलिस विभागाच्या माध्यमातून वारंवार कारवाई करूनही काही विक्रेते शेतशिवार, जंगलपरिसर व नदी नाल्यांचा आसरा घेत चोरट्या मार्गाने हातभट्टी लावून दारू गळतात. हे गाव अवैध दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असून या गावातील विक्रेत्यांच्या माध्यमातून परिसरातील विविध गावातील किरकोळ दारूविक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो. अशातच शेतशिवारात काही विक्रेत्यांनी मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे विविध गावातील गाव संघटना, धानोरा, गडचिरोली तालुका मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या शोधमोहीम राबविली असता, विविध ठिकाणी दारू गाळण्यासाठी मोहफुलाचा सडवा आढळून आला. यावेळी संपुर्ण दारू अड्डे उध्वस्त करीत जवळपास १ लाख ९ हजार रुपये किमतीचा १७ ड्रम मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट करण्यात आले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )