दुर्गम भागातील रुग्णांसाठी संकल्प फाउंडेशनची रुग्णवाहिका ठरणार ‘नवसंजीवनी’
– उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांचे प्रतिपादन; अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १३ : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेत वैद्यकीय सेवा मिळावी, तसेच उपचाराअभावी कोणत्याही रुग्णाची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने संकल्प फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका दुर्गम भागातील अपघातग्रस्त व गंभीर रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी केले.
संकल्प फाउंडेशनच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून तालुक्यात विविध आरोग्य शिबिरे व समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. समाजसेवेच्या कार्यादरम्यान अनेक रुग्णांना रुग्णवाहिकेअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन संस्थेने पुढाकार घेत ही अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.
मंगळवारी येथील किसान सभागृहाच्या पटांगणात आयोजित कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पोलीस ठाणेदार महेंद्र वाघ, भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, संकल्प फाउंडेशनचे डॉ. जगदीश बोरकर, सहकार बोर्डाचे अध्यक्ष वसंतराव मेश्राम, प्रा. डॉ. दशरथ आदे, आरोग्य सभापती तथा नगरसेवक सागर निरंकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोनेश मेश्राम, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी विवेक निरंकारी, भाजयुमो तालुकाध्यक्ष उल्हास देशमुख, फाजील शेख, पत्रकार प्रा. विनोद नागपूरकर, सिराज पठाण, कैलाश उईके, राकेश चव्हाण, बालू रहांगडाले, सादिक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकल्प फाउंडेशनचे फलिंद्र मांडवे, राहुल पाटणकर, भूषण बोरकर, मुकेश लाळे, अमित ठाकरे, मनीष मेश्राम, सुमेध रामटेके, गोविंद बोरकर, मुकेश बोरकर, नितेश नखाते, विष्णू कांबळे, अतुल अंबादे, बाळाजी नखाते, परमानंद सहारे आणि चंदू बनसोड यांनी सहकार्य केले.













