मानवी–हत्ती संघर्ष निवारणासाठी सेज फाउंडेशनचा पुढाकार
- रांगी येथे ग्रामस्थांशी थेट संवाद साधत जागृती
The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. २१ : धानोरा तालुक्यातील रांगी येथे वाढत्या मानवी–हत्ती संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सेज फाउंडेशन, कोलकाता यांच्या वतीने हत्ती–मानव संघर्ष कमी करण्यासाठी जनजागृती व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १८ डिसेंबर २०२५ रोजी रांगी येथील समाज भवनात झालेल्या या कार्यक्रमात गावकऱ्यांशी थेट संवाद साधत हत्तींच्या वर्तनाविषयी तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सेज फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा मुख्य उद्देश हत्ती आणि मानव यांच्यातील संघर्षाचा स्थानिक भागांवर होणारा परिणाम कमी करणे हा आहे. या उपक्रमांतर्गत गावातील समुदायाचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करून, त्यांच्या सूचना व अनुभवांच्या आधारे प्रकल्पाची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येत आहे.
या संवाद कार्यक्रमात ग्रामस्थांच्या समस्या, अनुभव व सूचना जाणून घेण्यात आल्या. हत्तींच्या हालचाली, पिकांचे नुकसान, सुरक्षिततेचे उपाय आणि संघर्ष टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांकडून मिळालेल्या मौल्यवान सूचनांच्या आधारे परिस्थिती सुधारण्यासाठी उपयुक्त उपाययोजना निश्चित करण्यात सेज फाउंडेशनला मोठी मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत रांगीच्या सरपंच सौ. फालेश्वरी प्रदीप गेडाम होत्या. मंचावर सेज फाउंडेशन, कोलकाता येथील मार्गदर्शक, ग्रामपंचायत अधिकारी मकरंद बांबोळे, श्रावण देशपांडे, दिवाकर भोयर यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे मानवी–हत्ती संघर्षाबाबत ग्रामस्थांमध्ये जागृती वाढण्यास मदत होणार असून, भविष्यात संघर्ष निवारणासाठी समन्वयात्मक आणि शाश्वत उपाययोजना राबविण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














