खेळ व सांस्कृतिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास : आ. रामदास मसराम
The गडविश्व
कोरची, दि. २१ : खेळ व सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, भावनिक व सामाजिक असा सर्वांगीण विकास होतो. विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करीत असतात, असे प्रतिपादन आमदार रामदास मसराम यांनी केले.
पंचायत समिती कोरची अंतर्गत तालुका स्तरीय शालेय बालक्रीडा व सांस्कृतिक कला संमेलन दिनांक १७ ते १९ डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जांभळी येथे उत्साहात पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आ. मसराम यांनी शालेय जीवनात खेळ व सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व विशद केले. स्पर्धात्मक युगात केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच धनाय मडावी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रशांत गड्डम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मडावी, उपसरपंच मोहन कुमरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, करखेडा तालुकाध्यक्ष जीवन नाट, प्रभाकर तुलावी, धनपाल मिसार, माजी पंचायत समिती सदस्य सदाराम नुरुटी, रामसुराम काटेंगे, संवर्ग विकास अधिकारी राजेश फाये, गटशिक्षणाधिकारी अमित दास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तीन दिवसीय या संमेलनात तालुक्यातील पाचही केंद्रांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. रंगीबेरंगी सांस्कृतिक झाक्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. जांभळी केंद्रातील शिक्षकांनी ‘बेटी बचाव’ विषयावर काढलेल्या सुंदर रांगोळीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मडावी यांनी आ. मसराम यांच्यासमोर गावातील विविध समस्या मांडत जांभळी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव भोंडे यांनी केले. संचालन गटशिक्षणाधिकारी अमित दास यांनी केले, तर आभार नरेश रामटेके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जांभळी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.














