रेल्वेची हत्तींच्या कळपाला भीषण धडक : ७ हत्ती ठार, राजधानी एक्स्प्रेसचे इंजिनसह ५ डबे रुळावरून घसरले
The गडविश्व
गुवाहाटी, दि. २१ : ईशान्य भारतात वन्यजीव व रेल्वे यांच्यातील संघर्षाचा आणखी एक भीषण प्रसंग समोर आला आहे. ईशान्य सीमांत रेल्वेच्या लुमडिंग विभागांतर्गत जमुनामुख–कॅम्पूर स्थानकांदरम्यान शनिवारी पहाटे सायरांग–नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने तब्बल ४२ हत्तींच्या कळपाला धडक दिली. या अपघातात ७ हत्तींचा जागीच मृत्यू झाला असून रेल्वेचे इंजिनसह ५ डबे रुळावरून घसरले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी न होता सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे हत्तींचा मोठा कळप रेल्वे रूळ ओलांडत असताना वेगात असलेल्या राजधानी एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. लोको पायलटने हत्तींना पाहताच आपत्कालीन ब्रेक लावले, मात्र प्रचंड वेगामुळे अपघात टाळता आला नाही. धडक इतकी तीव्र होती की रेल्वेचे पाच डबे रुळावरून खाली उतरले. गुवाहाटीपासून सुमारे १२६ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.
मृतांमध्ये गर्भवती हत्तीणीचा समावेश
स्थानिक नागरिक व वनविभागाच्या माहितीनुसार, मृत पावलेल्या ७ हत्तींमध्ये एका गर्भवती हत्तीणीचा समावेश आहे. याशिवाय काही दिवसांचे एक लहान हत्तीपिल्लू गंभीर जखमी झाले असून त्याला काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळील वन्यजीव पुनर्वसन केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. पिल्लाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
रेल्वे प्रशासनाची तत्परता; मदतकार्य सुरू
अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन पथक व तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना इतर डब्यांमध्ये सामावून घेण्यात आले. आवश्यक दुरुस्ती व तपासणीनंतर सकाळी ६.११ वाजता राजधानी एक्स्प्रेस गुवाहाटीकडे रवाना करण्यात आली.
दरम्यान, गुवाहाटी स्थानकावर प्रवाशांच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक (0361-2731621 / 22 / 23) जाहीर करण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे वन्यजीव मार्गांवरून जाणाऱ्या रेल्वे मार्गांबाबत पुन्हा एकदा सुरक्षितता उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews














