धक्कादायक! कुरखेडात कचरा गाडीत सापडले राष्ट्रध्वज
– प्रशासनाच्या निष्काळजीपणाने तिरंग्याचा उघड अपमान
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २१ : कुरखेडा नगर पंचायत क्षेत्रात राष्ट्रध्वजाचा उघड अपमान झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नगर पंचायतच्या कचरा गाडीत तिरंगे झेंडे आढळल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काही नागरिकांनी कचरा गाडीत पडलेले तिरंगे पाहून छायाचित्रे काढली व ती सोशल मीडियावर व्हायरल केल्याने ही प्रकरण पुढे आले आहे. हे झेंडे पूर्वीच्या शासकीय कार्यक्रमांतील असावेत, मात्र त्यांचा सन्मानाने निपटारा न करता कचऱ्यात टाकणे हा राष्ट्रसन्मानाला ठेच देणारा प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या घटनेचा शिवसेना (शिंदे गट) चे तालुका संघटक ईश्वर ठाकूर व तालुका आरोग्य प्रमुख शहजाद हाशमी यांनी तीव्र निषेध केला असून दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.
राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ नुसार राष्ट्रध्वजाचा अपमान हा गंभीर गुन्हा असून दोषींना कारावास व दंडाची शिक्षा होऊ शकते. दरम्यान, या प्रकरणावर नगर पंचायत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही बाब चौकशीपर्यंत जाईल की केवळ औपचारिक कारवाईतच सीमित राहील, असा सवाल उपस्थित झाला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews














