गडचिरोलीतील अंगणवाडी शिक्षणासाठी १६ कोटींचा प्रकल्प; जिल्हा परिषद-क्वेस्टमध्ये करार

3

गडचिरोलीतील अंगणवाडी शिक्षणासाठी १६ कोटींचा प्रकल्प; जिल्हा परिषद-क्वेस्टमध्ये करार
– तीन वर्षांत पूर्व प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणार; दुर्गम आणि आदिवासी भागातील बालकांना होणार लाभ
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील पूर्व प्राथमिक शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण आणि सक्षम करण्यासाठी १६ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद, गडचिरोली आणि क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्वेस्ट) यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून अंगणवाडी शिक्षण व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.
‘गडचिरोली जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा यंत्रणेद्वारे पूर्व बाल्यावस्थेतील शिक्षणाचे बळकटीकरण’ असे या प्रकल्पाचे नाव आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून बालकांना वयानुरूप गुणवत्तापूर्ण पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, त्यांची शैक्षणिक पायाभरणी मजबूत करणे आणि सर्वांगीण विकासाला चालना देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
विशेषतः जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील बालकांना शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अंगणवाड्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे नियोजन आहे.
या प्रकल्पासाठी टाटा ट्रस्ट्स, कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) निधी तसेच अन्य बाह्य भागीदारांच्या माध्यमातून निधी उभारण्यात येणार आहे. निधीची उपलब्धता आणि शासनाच्या प्रचलित नियमांच्या अधीन राहून प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने सहमती दर्शविली आहे.
प्रकल्पाच्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार असून, दोन वर्षांनंतर त्याच्या प्रत्यक्ष परिणामांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी शिक्षणाला नवी दिशा मिळण्यासोबतच बालकांच्या शैक्षणिक विकासाचा पाया अधिक भक्कम होण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here