‘महसूल प्रशासन जनतेच्या दारी’ : गडचिरोलीतील ५९ महसूल मंडळांत विशेष शिबिरे
– लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ४ : सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी स्थानिक पातळीवरच सोडवून शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानांतर्गत विशेष शिबिरांची मेगा मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील एकूण ५९ महसूल मंडळांमध्ये टप्प्याटप्प्याने ही शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
या उपक्रमाची सुरुवात ७ मार्चपासून होणार असून, त्यानंतर १४ मार्च, १० एप्रिल, १७ एप्रिल, २४ एप्रिल, ८ मे व १५ मे या नियोजित तारखांना महसूल मंडळनिहाय शिबिरे पार पडतील. प्रत्येक ठिकाणी संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून अर्ज स्वीकृती, कागदपत्र पडताळणी व शक्य तितक्या प्रकरणांचा जागीच निपटारा करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या विशेष शिबिरांमध्ये सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी, उत्पन्न, जात व अधिवास दाखले, रेशन कार्डाशी संबंधित कामे तसेच संजय गांधी निराधार योजनेसह विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज स्वीकारले जाणार असून, प्रलंबित प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे. अनेकदा तांत्रिक कारणांमुळे किंवा प्रक्रियेची अपुरी माहिती असल्यामुळे नागरिकांची कामे रखडतात. ही अडचण दूर करून पारदर्शक व गतिमान सेवा देण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
धानोरा व एटापल्लीसारख्या भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि दुर्गम तालुक्यांमध्ये सहापेक्षा अधिक महसूल मंडळे असल्याने तेथे अतिरिक्त शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. दुर्गम भागातील नागरिकांनाही समान संधी मिळावी आणि एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे.
“प्रशासन स्वतःहून नागरिकांच्या दारी येत आहे. आपल्या गावाजवळील महसूल मंडळात आयोजित शिबिरात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रलंबित कामे निकाली काढावीत,” असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी पंडा यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














