गडचिरोलीत शासकीय विज्ञान महाविद्यालय परिसरात ४ फूट ‘घोणस’चा थरार
– सर्पमित्रांच्या तत्परतेने नागरिकांना दिलासा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : शहरातील शासकीय विज्ञान महाविद्यालय परिसरात आज पहाटे सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास चार फूट लांबीचा घोणस साप आढळून आल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या नजरेस हा विषारी साप पडताच परिसरात एकच खळबळ उडाली.
यावेळी तेथे उपस्थित असलेले नगरसेवक बाळू टेमभुर्णे यांनी तात्काळ सर्पमित्र अजय कुकडकर यांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच अजय कुकडकर घटनास्थळी दाखल झाले आणि अत्यंत कौशल्याने व सावधगिरी बाळगत घोणस सापाला सुरक्षितरीत्या पकडले.
पकडलेला साप कोणताही धोका न होता त्याच्या नैसर्गिक अधिवासात जंगल परिसरात सोडण्यात आला. सर्पमित्रांनी नागरिकांना साप दिसल्यास घाबरून न जाता शांत राहावे तसेच सापाला मारण्याऐवजी तात्काळ सर्पमित्र किंवा वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन केले.
घटनेच्या वेळी भीमराव भैसारे, उज्वला साखरे, वैभव नांदगावे, कल्याणी भैसारे, शीतल मेश्राम, छकुली साखरे, प्रणाली नांदगावे, संजय मेश्राम आदी नागरिक उपस्थित होते. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














