कीटकजन्य आजारांच्या प्रभावी प्रतिबंधासाठी संशोधन प्रकल्प उपयुक्त ठरेल : मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे
– गडचिरोलीत प्रशिक्षण कार्यशाळा व मानक कार्यप्रणालीचे प्रकाशन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : “कीटकजन्य आजारांवरील या नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पाचा सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी मोठा फायदा होईल. प्रकल्पातील अभ्यासाच्या आधारे कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास मदत होणार आहे. हिवतापासह कीटकजन्य आजारांना वेळीच प्रतिबंध करणे आणि प्रभावी उपाययोजना राबविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR–NIVCR) आणि राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण केंद्र (NCVBDC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय एकात्मिक मॉलिक्युलर झेनोमॉनिटरिंग नेटवर्क’ (iMX-NET) प्रकल्पांतर्गत जिल्हा प्रशिक्षण केंद्र, गडचिरोली येथे आयोजित दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी कीटक सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणालीचे (SOPs) मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. माधव शिंदे, शास्त्रज्ञ डॉ. ए. एन. श्रीराम, डॉ. रुचिता खांडरे, डॉ. अतुल नागीमे, कीटकजन्य रोग नियंत्रण सल्लागार राजेश कार्लेकर यांच्यासह आरोग्य अधिकारी, तंत्रज्ञ आणि प्रकल्प कर्मचारी उपस्थित होते.
या प्रकल्पांतर्गत डॉ. ए. एन. श्रीराम यांच्या मार्गदर्शनाखाली झेनोमॉनिटरिंग संशोधन राबविण्यात येणार आहे. त्यासाठी वाकडी उपकेंद्रात सुसज्ज झेनोमॉनिटरिंग प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. गडचिरोली तालुक्यात पुढील तीन वर्षे पथदर्शी स्वरूपात हा संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार असून, हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग, चिकनगुनिया या आजारांशी संबंधित वाहक कीटकांचा वैज्ञानिक अभ्यास करण्यात येईल. या संशोधनातील निष्कर्षांचा उपयोग जिल्ह्यातील तसेच देशपातळीवरील कीटकजन्य रोग नियंत्रणाच्या उपाययोजना आणि धोरण निश्चितीसाठी होऊ शकेल.
कार्यशाळेत तज्ज्ञांनी कीटकजन्य आजारांची सद्यस्थिती आणि मॉलिक्युलर झेनोमॉनिटरिंग तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले. हिवताप, हत्तीरोग आणि कालाआजार यांच्या निर्मूलनाच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करताना, तसेच डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिका यांसारख्या विषाणूजन्य आजारांचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी नियमित व दर्जेदार सर्वेक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मॉलिक्युलर झेनोमॉनिटरिंग तंत्रज्ञानाद्वारे डास व इतर वाहक कीटकांमधील रोगजंतूंचा शोध घेतला जातो. त्यामुळे पारंपरिक सर्वेक्षणाला पूरक वैज्ञानिक माहिती उपलब्ध होऊन रोगप्रसाराचा धोका ओळखण्यास आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन करण्यास मदत होते, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
प्रकाशित मानक कार्यप्रणालीमुळे क्षेत्रीय पातळीवरील कीटक सर्वेक्षणाच्या पद्धतींमध्ये एकसूत्रता येऊन संकलित माहितीची अचूकता आणि विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार आहे. दोन दिवसीय कार्यशाळेत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक पद्धती आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय कामासाठी आवश्यक तांत्रिक व व्यावहारिक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
समारोपप्रसंगी उपस्थित मान्यवर व मार्गदर्शकांचे आभार मानण्यात आले. दुर्गम भागात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभाग आणि प्रकल्प कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करून पुढील क्षेत्रीय कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.













