– राष्ट्रसंतांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजणार
The गडविश्व
गडचिरोली, ४ सप्टेंबर : गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र सुरू होत आहे. या अध्यासन केंद्राची पहिली सभा नुकतीच पार पडली. गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्राच्या कार्याची रूपरेषा ठरविण्यासाठी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.या प्रसंगी प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे ,अडव्होकेट गोविंद भेंडारकर ,अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोझरी अमरावती चे जनार्धन पंथ बोचे, सुभाष लोहे, गुरुदेव सेवा मंडळ चिमुर अशोक चरडे,माजी प्राचार्य डॉ. नामदेव कोकोडे, गुरुदेव सेवा मंडळ गोपाळ कडू, अध्यासन केंद्राचे समन्वयक विनायक शिंदे उपस्थित होते.यावेळी या अध्यासन केंद्राबाबत अनेक मुद्यांवर चर्चा करून महत्वाचे निर्णय घेण्यात आले.तसेच गुरुदेव सेवमंडळ मोझरी कडून ६५ पुस्तक विद्यापीठाला भेट देण्यात आली.
या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संपूर्ण जीवन कार्याचा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युग प्रवर्तक होते व समाज सेवेसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. विविध ४१भाषांमध्ये त्यांचे कार्य , आत्मचिंतन व वैचारिक ठेवा उपलब्ध आहे. त्यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचावे.स्वातंत्र्याच्या आंदोलनातील योगदान , सामान्य माणूस प्रेरित व्हावा. त्याच्या श्लोकांचे डीजीटलायझेशन करणे, या अध्यासन केंद्राच्या कार्याची दिशा ठरवणे.शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षातील कार्याची रूपरेषा ठरवणे. साहित्य संमेलन भरवणे , ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे. एक उत्तम नागरिक घडवण्यासाठी नैतिक शिक्षण देणारा कोर्स सगळ्या महाविद्यालयांनी राबवावा .अशा महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्राचे लवकरच उदघाटन करण्यात येईल असा आशावाद कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाची आवश्यकता
महाराष्ट्र व विदर्भ, विशेष करुन चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात त्यांचे कार्य फार मोठे आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथे कर्मयोगी तुकाराम दादा गीताचार्य यांच्या पुढाकाराने साकारलेली ग्रामगीतेची प्रयोगशाळा, गोंदोडा येथील राष्ट्रसंतांची तपोभूमी, कमलापूर जिल्हा गडचिरोली येथील राष्ट्रसंतांनी सुरू केलेली निवासी आश्रमशाळा, आंधळी जिल्हा गडचिरोली येथील राष्ट्रसंतांचे कार्य दोन्ही जिल्ह्यातील गावागावात कार्यरत असलेले हजारो गुरुदेव सेवा मंडळे व ग्रामसभा भवन त्यांच्या कार्याची व विचारांची आजही साक्ष देत आहेत.
सर्वधर्म समभाव जपणारे त्यागी विचारवंत आणि राष्ट्र निर्मितीसाठी झोकून देणारे कार्यकर्ते तयार करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठात अशा अध्यासन केंद्राची नितांत आवश्यकता होती, ती आता पूर्ण होणार आहे.
भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांचे योगदान अपूर्व असे आहे. चिमूर आष्टीचा स्वतंत्रसंग्राम त्यांच्या मार्गदर्शनाखालीच घडला. त्यासाठी त्यांनी चंद्रपूर व रायपूर येथील कारागृहात शिक्षाही भोगली. तुकडोजी महाराजांनी ५० हजाराहून अधिक गुरुदेव सेवा मंडळाची निर्मिती करून देशात समाजकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली.