धानोऱ्यात विजेच्या समस्यांवर आक्रोश मोर्चा ; महावितरणला नागरिकांचा इशारा

139

धानोऱ्यात विजेच्या समस्यांवर आक्रोश मोर्चा ; महावितरणला नागरिकांचा इशारा
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. २९ : धानोरा शहर व तालुक्यात वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या पुरवठ्याविरोधात आज समस्त नागरिकांनी आणि नगरपंचायतीच्या वतीने म.रा.वि.वि.कं. धानोरा पॉवर हाऊसवर धडक आक्रोश मोर्चा काढला. महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या या मोर्चात ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत विजेच्या समस्या अधिकाऱ्यांना अवगत केल्या.
ग्रामस्थांनी ठामपणे सांगितले की, “धानोरा तालुक्यात वीज पुरवठा सुरू झाल्यापासून असा खंडितेचा प्रकार कधीच पाहिला नव्हता.” सतत खंडित होणाऱ्या विजेमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, घरगुती व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ग्राहकांवर आर्थिक भुर्दंड पडत आहे. घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तर ही समस्या अधिक गंभीर ठरली आहे. विजेमुळे कामात अडथळा येतो, काम मंदावते आणि तणाव वाढतो.
तालुक्यातील शेतीवरही या समस्येचा मोठा परिणाम जाणवत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी बंद पडत असून पिकांना पाणीपुरवठा थांबत आहे. नागरिकांनी संतप्त इशारा देत म्हटले की, आठवडाभरात ही समस्या मार्गी लागली नाही तर आंदोलनाला वेगळे वळण दिले जाईल.
मोर्चात धानोरा नगरपंचायत अध्यक्षा पौर्णिमा सयाम, उपाध्यक्ष सीमा काटेंगे, नगरसेवक विनोद लेनगुरे, राजू मोहुर्ले, समीर कुरेशी यांच्यासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, धानोरा शहरात घरगुती ग्राहकांच्या संमतीशिवाय लावण्यात आलेल्या डिजिटल मीटरांमुळे भरमसाठ वीजबिल आकारले जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. “बिलांमुळे ग्राहक मेटकुटीला आले आहेत, याकडे महावितरणने गंभीरपणे लक्ष द्यावे,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here