प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 : घरबसल्या स्व-सर्वेक्षणाची संधी, 2024 साठी पात्र लाभार्थ्यांना सुवर्ण संधी
The गडविश्व
गडचिरोली , दि. ०३ : प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (टप्पा-2) अंतर्गत “आवास प्लस 2024” सर्वेक्षण लवकरच सुरू होत असून, यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना घरबसल्या स्वतः मोबाईलवरून स्व-सर्वेक्षण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा पात्र लाभार्थ्यांसाठी विशेषतः उपयुक्त ठरणार असून, गरजू कुटुंबांना योजनेंतर्गत आपले स्थान निश्चित करण्याची थेट संधी मिळणार आहे.
“स्व-सर्वेक्षण” ही या टप्प्याची प्रमुख वैशिष्ट्य असून, https://pmayg.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून “Awas Plus 2024” हे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोणताही पात्र लाभार्थी आपले सर्वेक्षण स्वतः करू शकतो. यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि नागरिकाभिमुख होणार आहे. ही योजना म्हणजे गरजू कुटुंबांसाठी स्थिर, सुरक्षित निवाऱ्याचे स्वप्न साकार करणारा प्रयत्न आहे. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन घरबसल्या स्व-सर्वेक्षण करावे व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र भुयार यांनी केजे आहे.

स्व-सर्वेक्षणाची महत्त्वाची वैशिष्ट्ये :
पात्र नागरिक स्वतः किंवा इतर व्यक्तीच्या मदतीने आपल्या मोबाईलवरून सर्वेक्षण करू शकतात. एका मोबाईलवरून फक्त एकाच कुटुंबाचे सर्वेक्षण करता येते. ज्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे, परंतु ज्यांची नावे 2018 च्या आवास प्लस प्रतीक्षा यादीत समाविष्ट नव्हती, अशा कुटुंबांसाठी ही विशेष संधी आहे.
कोण पात्र आहेत?
हे सर्वेक्षण सर्व कुटुंबांसाठी नाही, तर केवळ खालील निकष पूर्ण करणाऱ्यांसाठी आहे. जे कुटुंबे सध्या बेघर आहेत किंवा कच्च्या घरात वास्तव्यास आहेत.
ज्यांची नावे 2018 च्या आवास प्लस प्रतीक्षा यादीत नव्हती. जे नवीन एक्स्क्ल्यूजन क्रायटेरिया नुसार प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (टप्पा-2) साठी पात्र ठरतात.
सर्वेक्षणाची दुसरी पद्धत :
स्वतः सर्वेक्षण करणे शक्य नसल्यास, ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणीकृत सर्वेक्षकांकडून सर्वेक्षणदेखील करता येईल.
प्रशिक्षण आणि नियोजन :
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 19 मार्च 2025 रोजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने कार्यशाळा घेण्यात आली. तसेच, प्रत्येक पंचायत समिती स्तरावर सरपंच, ग्रामसेवक यांच्यासाठी प्रशिक्षण सत्रेही आयोजित करण्यात येत आहेत.
ज्यांना खरोखरच घरकुलाची गरज आहे, त्यांनी त्वरित स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये आपले नाव नोंदवावे, तसेच “आवास प्लस 2024” ॲपद्वारे स्व-सर्वेक्षण करून आपली माहिती अद्ययावत करावी. सर्वेक्षण करताना काही अडचण आल्यास, https://pmayg.nic.in या संकेतस्थळावर माहिती मिळवता येईल किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा / पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे मार्फत करण्यात आले आहे.