-पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन
The गडविश्व
गडचिरोली, ३१ ऑगस्ट : आरमोरी पोलिस स्टेशन येथे मुक्तिपथ शहर व वॉर्ड संघटनेच्या संयुक्त विद्यमाने राखी विथ खाकी या रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी पोलिस दादांना राखी बांधून शहरातील व ग्रामीण भागातील अवैध दारूविक्री बंद करण्याची ओवाळणी मागितली. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत महिलांच्या सहकार्याने विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष पवन नारनवरे , पोलीस उपनिरीक्षक संजय कुमार टेकाम , पोलीस उपनिरीक्षक एस.सी.कडाले, पोलीस उपनिरीक्षक ज्योती रक्षे , पोलीस उपनिरीक्षक ठाकरे, चिकनकर यांच्यासह सर्व पोलीस बांधव उपस्थित होते. यावेळी आरमोरी शहरातील शहर संघटन, वार्ड संघटनेच्या महिलांनी राखी बांधून कार्यक्रमाला सुरुवात केली. सोबतच पोलिस विभागाला निवेदन देऊन शहरासह ग्रामीण भाग दारूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी महिलांनी केली. दरम्यान शहराचे नगराध्यक्ष यांनी शहरातील वार्डा वार्डातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी नगरपरिषदेच्या विशेष सभेमध्ये चर्चा करून कारवाई करण्यासाठी सहकार्य करण्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक टेकाम यांनी अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी विक्रेत्यांवर कारवाई करुन त्यांना शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करू. आम्हाला तुमची साथ हवी पंच म्हणून आपण साक्ष द्यावी, तटस्थ राहिल्यास विक्रेत्यांवर कारवाई करून नक्कीच बहिणींची रक्षा करण्याचे वचन त्यांनी महिलांना दिले. उपनिरीक्षक रक्षे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. महिलांनी पोलीस दादांपुढे आपले प्रश्न व समस्या मांडून चर्चा केली. राखी विथ खाकी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुक्तिपत तालुका संघटक विनोद कोहपरे, प्रेरक स्वीटी आकरे, शारदा बनसोड, राकेश जाधव यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला 20 पोलिस बांधव व शहरातील 25 महिला उपस्थित होत्या.