The गडविश्व
गडचिरोली, १३ ऑगस्ट : मागील वर्षी प्रमाणेच या वर्षी सुद्धा संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अभियानात पंतप्रधान यांनी ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या नव्या उपक्रमाची भर घालून सर्व देश वासीयांना आपल्या भू-माते बद्दल आपली भावना तसेच शहिदांबद्दल आपला आदर व्यक्त करण्यास संधी प्राप्त करून दिली आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातही ९ ते १४ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत आवार, ई. पैकी कोणत्याही एक ठिकाणी १. शिळाफलक उभारणी शहीद स्मारक, २. वसुधा वंदन (७५ देशी दीर्घायुषी झाडांचे वृक्षारोपण) अमृत वाटिका तयार करणे, ३. वीरांना वंदन – वीर शहीद यांच्या कुटुंबियांचा सन्मान, ४. पंच प्रण शपथ व ५. ध्वजारोहण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे १५ ऑगस्ट ला सर्व ठिकाणी ध्वजारोहण झाल्यावर १६ ते २० ऑगस्ट दरम्यान ‘मिट्टी कलश यात्रा’ काढण्यात येणार आहे. ज्यामध्ये गावातील एक-दोन मुठ माती एका कलश मध्ये घेऊन त्याची संपूर्ण गावात फेरी काढण्यात येऊन नंतर उत्साहाच्या वातावरणात गावातील युवकांच्या माध्यमातून तो मातीचा कलश तालुक्याला जमा होईल व त्यानंतर २७ ते ३० ऑगस्ट कालावधीत प्रत्येक तालुक्याचा एक प्रतिनिधी सर्व गावांची एकत्रित झालेली माती तालुक्याच्या कलश मध्ये घेऊन दिल्लीतील कर्तव्य पथ येथे होणाऱ्या अमृत वाटिका करिता घेऊन जाणार आहे.
यंदा सुद्धा अभियान अंतर्गत सर्व उपक्रमांची अंमलबजावणी व जबाबदारी महाराष्ट्राच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग तर्फे नोडल म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) रविंद्र कणसे व तालुका स्तरावर नोडल म्हणून पंचायत समिती च्या सर्व गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेली आहे.
या अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी गडचिरोली संजय मीणा यांचे मार्गदर्शनाखाली ९ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्रांगण येथे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह यांचे हस्ते गडचिरोली चे वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांनी व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे “पंच प्रण शपथ” घेतली. यामध्ये भारताच्या पंतप्रधान यांनी दिलेले पंच प्रण घेण्यात आले – १. विकसित भारताचे लक्ष्य, २. गुलामीच्या प्रत्येक बंधातून मुक्ती, ३. आपल्या वारश्याचा व परंपरेचा अभिमान, ४. भारतीयांची एकता आणि एकजुटता आणि ५. सर्व नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना. सदर कार्यक्रमाचे नियोजन पंचायत विभागाचे अधिकारी रविंद्र कणसे व कर्मचारी तसेच VSTF जिल्हा कार्यकारी प्रशांत कारमोरे यांनी केले.