गडचिरोली–आरमोरी मार्गावर भरधाव ट्रॅव्हल्सची एसटी बसला भीषण धडक; 20 प्रवासी जखमी
– 50 हजारांचे नुकसान, जीवितहानी टळली
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : गडचिरोली–आरमोरी या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर चुरमुरा गावानंतरच्या वळणाजवळ सोमवारी (दि. 19) सकाळी भरधाव ट्रॅव्हल्सने एसटी बसला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत मोठा अपघात घडला. या अपघातात ट्रॅव्हल्समधील तब्बल 20 प्रवासी जखमी झाले असून एसटी बसचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
बस चालक शत्रुघण लहानुजी मगरे (वय 50) हे एसटी बस क्रमांक MH14 LX–5926 घेऊन गडचिरोली–आरमोरी–कासवी–फरी–वडसा या मार्गावर प्रवाशांसह सकाळी सुमारे 9 वाजता मार्गस्थ झाले होते. चुरमुरा गाव ओलांडल्यानंतर आरमोरीकडे जाणाऱ्या पहिल्या वळणाजवळ समोरून येणारे ट्रक एकमेकांना ओव्हरटेक करीत असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी त्यांनी बसचा वेग कमी करून वाहन रस्त्याच्या डाव्या कडेला घेतले. याच दरम्यान बसच्या पाठीमागून येणाऱ्या MH 34-AB-8320 क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सच्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत थेट बसला मागून जबर धडक दिली. या जोरदार धडकेत ट्रॅव्हल्समधील 20 प्रवासी जखमी झाले, तर एसटी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे काही काळ गडचिरोली–आरमोरी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, गडचिरोली–आरमोरी मार्गावर लोहखनिज वाहतूक करणारे शेकडो ट्रक तसेच खासगी ट्रॅव्हल्सची मोठी वर्दळ असते. अरुंद रस्ता आणि बेदरकार ओव्हरटेकमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मार्गावर वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident #armori














