– हेल्प लाईन १०९८ वर संर्पक साधण्याचे प्रशासनाचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली,दि.०९ : अक्षय तृतीया हा महत्वाचा मुहुर्त असल्याने या मुहुर्तावर सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग नवी दिल्ली यांच्याकडुन अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडुन निर्देश प्राप्त झाले आहेत.
उद्या १० मे २०२४ रोजी अक्षय तृतीया आहे या दिवशी संभावित बालविवाहाच्या घटना थांबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियमातील तरतुदीनुसार बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावा व याबाबत प्रशासनाला माहिती द्यावी. १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने अल्पवयीन वधुशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि १ लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. जाणीवपुर्वक बालविवाह ठरविल्यास, त्यासाठी सोहळा पार पाडल्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती तसेच संबधित वर वधु यांचे आई वडील किंवा पालक, अन्य नातेवाईक व मित्रपरिवार, धार्मीक स्थळाचे विश्वस्त, फोटोग्राफर, प्रिंटीग प्रेस, वाजतंत्री, लग्न सभागृहाचे व्यवस्थापक, कॅटरिंग अशा सर्वांनी हा विवाह घडविल्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाही, जे अशा विवाहात सामील झाले त्या सर्वांना दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपये पर्यंत दंड किवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बालविवाहाबाबतची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चॉईल्ड हेल्प लाईन १०९८ गडचिरोली या नंबरवर कळविण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #balvivah #On the day of Akshaya Tritiya, special attention will be given to stop the possible incidents of child marriage)