दुर्गंधी ने राग अनावर : चक्क मुख्यधिकारी आणि नगराध्यक्षाच्या कक्षात फेकल्या मृत कोंबड्या

985

– पालिका वर्तुळात एकच खळबळ
The गडविश्व
चंद्रपूर, १७ जून : घराजवळ असलेल्या चिकन, मटणच्या दुकानांमुळे बाराही महिने दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य असल्याने याबाबत वारंवार नगरपालिकेकडे तक्रार करूनही कुठलीही उपाययोजना न झाल्याने एका संतप्त नागरिकाने चक्क मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या कक्षात मृत कोंबड्या, त्यांची अवयवे व कचरा टाकल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे घडला. या प्रकाराने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली.
गडचांदूर नागरपरिषदेला मुख्यधिकारी नसल्याने संपूर्ण कारभार प्रभारी मुख्यधिकारीवर सुरू आहे. सध्या तेही पद रिक्त होते. मात्र सदर घटना घडल्याने तात्काळ सूरज जाधव यांच्याकडे प्रभार देण्यात आला. त्यांनी नागरपरिषदेला तात्काळ रुजू होऊन सदर प्रकरणाची दखल घेत पोलीस स्टेशन गडचांदूर येथे त्या व्यक्तिविरुद्ध तक्रार दाखल केली.
प्राप्त माहितीनुसार रफीक निजामी यांच्या घराजवळ वाॅर्ड क्र.२ येथे चिकन, मटण विक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना दुर्गंधी व फेकलेल्या जैविक कचऱ्याचा त्रास होत होता. दुकानदाराने फेकलेली घाण तत्काळ साफ करावी, अशी नगरपरिषदेमधील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना तोंडी तक्रार त्यांनी केली. तसेच १६ मार्च २०२० ला नगरपरिषदेने गावातील वेगवेगळ्या परिसरात असलेली चिकन, मटणाची दुकाने एकाच ठिकाणी हलविण्यात येतील, असा ठराव मंजूर केला. परंतु, एवढ्या कालावधीनंतरही जागेअभावी व नगरपरिषद पदाधिकाऱ्यांमधील आपसी मतभेदांमुळे ते काम तसेच खोळंबून राहिले. म्हणून शुक्रवारी संतप्त झालेल्या रफीक निजामी यांनी नगरपरिषद कार्यालयात मृत कोंबड्या व त्यांचे अवयव टाकल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here