“NHM कर्मचाऱ्यांचा संघर्ष उफाळला ; सरकारच्या धमकीवर गडचिरोलीत ‘आप’ची आक्रमक हाक”

192

– ३०,००० हून अधिक कर्मचारी रस्त्यावर; आरोग्यसेवा ठप्प होण्याची शक्यता
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (NHM) कंत्राटी कर्मचाऱ्यांचे १९ ऑगस्टपासून सुरू असलेले बेमुदत आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. सरकारने कठोर कारवाईचा इशारा दिल्याने संघर्ष उफाळून आला असून, गडचिरोलीत आम आदमी पार्टीने (आप) सरकारवर आक्रमक हल्ला चढवला आहे.
‘आप’चे जिल्हाध्यक्ष नसीर हाशमी म्हणाले, “हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेल्या कर्मचाऱ्यांना गुन्हेगार ठरवणे हा लोकशाहीचा अपमान आहे. दहा वर्षांपासून मानधनावर काम करणारे NHM कर्मचारी कोरोनासारख्या संकटात जीव धोक्यात घालून सेवा देत होते, पण आज त्यांना सरकारच्या दडपशाहीला सामोरे जावे लागत आहे.”
या आंदोलनात ३०,००० हून अधिक कर्मचारी सहभागी असून, महाराष्ट्र राज्य एकत्रिकरण समितीचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी स्पष्ट इशारा दिला की, “संविधानिक मार्गाने लढणे हा गुन्हा नाही; सरकारने धमक्या थांबवून संवाद साधला पाहिजे.”
हाशमी यांनी सरकारवर गंभीर आरोप करत सांगितले की, १४ मार्च २०२४ रोजीच्या समायोजनाच्या निर्णयाची अंमलबजावणी आजवर झालेली नाही. मुख्यमंत्री यांनी १५० दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते, मात्र २९ दिवस शिल्लक असतानाही आरोग्य विभागाने चर्चा न केल्यामुळे कर्मचाऱ्यांचा रोष वाढला आहे. “वेतनवाढ, विमा संरक्षण, समान काम–समान वेतन या मूलभूत मागण्यांवर सरकारकडून टाळाटाळ सुरू आहे. मंत्री प्रकाश आबिटकर सकारात्मक असले तरी कृती शून्य आहे. हा भ्रष्टाचार आणि उदासीनतेचा खेळ आहे,” असा हल्ला हाशमींनी केला.
या आंदोलनामुळे गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात आरोग्यसेवा कोलमडण्याची भीती आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून असलेल्या ग्रामीण जनतेला याचा थेट फटका बसणार आहे.
‘आप’ने आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत सरकारला इशारा दिला आहे – “मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही. मंत्री आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली तातडीने बैठक न झाल्यास ही लोकशाहीची हत्या ठरेल.”
राज्यस्तरीय आंदोलनाची हाक देत ‘आप’ने गडचिरोलीसह सर्व शाखांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले असून, सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत तर परिस्थिती आणखी चिघळणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here