The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ३० : तालुक्यातील रांगी गावाचा विजेच्या समस्यांवर संताप उफाळला असून, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर ग्रामसभेत ठराव पारित करून ठोस पावले उचलली आहेत.
२८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की, रांगी गावाचा वीजपुरवठा धानोरा बॅकफिटवरून तोडून निमगाव बॅकफिटला जोडणी करण्यात यावी. याबाबतचा ठराव आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि सहाय्यक अभियंता धानोरा यांना देण्यात आला आहे.
गावातील वीजपुरवठा रात्री-रात्रभर खंडित राहिल्याने नागरिकांना अंधारात वास्तव्य करणे कठीण झाले आहे. विद्यार्थी अभ्यास करू शकत नाहीत, तर दिवसा देखील बँकिंग, कार्यालयीन व ऑनलाइन कामे ठप्प होतात. अशा परिस्थितीत नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत होत असून आता ठोस उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या ग्रामसभेला सरपंच फालेश्वरी प्रदीप गेडाम, उपसरपंच नुरज हलामी, सदस्य शशीकांत साळवे, दिनेश चापळे, रांकेश कोराम, अर्चना मेश्राम, शशिकला मडावी, वच्छला हलामी, विद्या कपाट, सचिव मकरंद बांबोळे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews













