राष्ट्रीय महामार्ग की धुळीचा सापळा? कुरखेडावासीय हैराण

98

राष्ट्रीय महामार्ग की धुळीचा सापळा? कुरखेडावासीय हैराण
– दीड वर्षांपासून रखडलेले रस्ता-पूल काम ; पाहणीत आमदार रामदास मसराम यांचा संताप
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २५ : कुरखेडा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासह सती नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामात मागील दीड वर्षांपासून सुरू असलेल्या संथ, ढिसाळ व नियोजनशून्य कामामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. सर्वत्र उडणारी धूळ, अर्धवट रस्ते, खड्डे व निकृष्ट दर्जाचे बांधकाम यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दैनंदिन वाहतूकही पूर्णतः विस्कळीत झाली आहे.
कुरखेडा–वडसा मार्गावरील विद्यानगर ते जांभूळखेडा या सुमारे चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण, सिमेंटीकरण तसेच सती नदीवरील मोठा पूल व इतर लहान पुलांचे बांधकाम एका कंत्राटदार कंपनीकडे आहे. मात्र कामाला ठोस नियोजन नसल्याने अनेक ठिकाणी जुना डांबरी रस्ता खोदून केवळ गिट्टी-बोल्डर टाकून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
काही ठिकाणी सिमेंट काँक्रिटचा पहिला थर टाकण्यात आला असला तरी आवश्यक क्युअरिंग न झाल्याने सिमेंट-रेतीची तीव्र धूळ उडत आहे. यामुळे लहान मुले, वृद्ध व आजारी नागरिकांना श्वसनविकारांचा त्रास होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा बांधण्यात आलेली गटारे अर्धवट व तुटक असून निकृष्ट दर्जामुळे अनेक ठिकाणी त्यांना भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन रस्त्यावर पाण्याची मोठी डबकी साचत होती.
मागील पावसाळ्यात गोठणगाव नाका ते जांभूळखेडा दरम्यान रस्ता दोन्ही बाजूंनी खोदण्यात आल्याने जड वाहने वारंवार फसत होती व वाहतूक ठप्प होत होती. अद्यापही तेथील काम अपूर्ण असल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच कुरखेडा शहरातून देसाईगंजकडे जाणारा मार्ग खोदण्यात आल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार रामदास मसराम यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता केळकर, उपविभागीय अभियंता लिंगावर, कनिष्ठ अभियंता अमित रामटेके, बांधकाम कंपनीचे मुख्य व्यवस्थापक राजेश तिनखेडे, प्रकल्प संचालक संदीप भैसारे, स्थानिक पदाधिकारी व नागरिकांसह संपूर्ण कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कामातील अनियमितता, निकृष्ट दर्जा व नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत अधिकाऱ्यांना व कंत्राटदार कंपनीला जाब विचारत खडे बोल सुनावले. रखडलेले काम तातडीने पूर्ण करून धूळ नियंत्रण, दर्जेदार बांधकाम व सुरळीत वाहतुकीची व्यवस्था करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #NationalHighway #RoadConstruction #PublicInconvenience #InfrastructureNegligence #RoadSafety #DustPollution #DelayedProject #PublicHealth #LocalIssues #Kurkhada

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here