मिनी डोअरची झाडाला धडक ; १० जखमी, ४ गंभीर

62

मिनी डोअरचा झाडाला भीषण अपघात ; १० जखमी, ४ गंभीर
– रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन घसरल्याचा संशय
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. २४ : तालुक्यातील येरंडी येथून लेखा येथे नातेवाईकाच्या घरी बारशाच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या मिनी डोअर वाहनाचा भीषण अपघात झाला. राजोली–धानोरा मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला घसरत थेट झाडावर आदळले. या अपघातात एकूण १० जण जखमी झाले असून, त्यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना २३ जानेवारी रोजी दुपारी सुमारे ३ वाजता घडली.
लेखा येथील रामा हलामी यांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमासाठी येरंडी येथून नातेवाईक मिनी डोअरने प्रवास करत होते. राजोली–धानोरा मार्गावर नव्याने सिमेंट काँक्रीटचे रस्त्याचे काम सुरू असून, त्या ठिकाणी पाणी टाकण्यात येत असल्याने रस्ता निसरडा झाला होता. याच दरम्यान वाहन घसरून रस्त्याखाली उतरले व झाडाला धडकले. रस्त्याच्या कडा भरलेल्या नसल्याने अपघाताची तीव्रता वाढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या अपघातात चालक प्रफुल पदा (२७, येरंडी) याच्यासह लालाजी गावडे (५०, नवरगाव), मोतीराम उसेंडी (५०), गणू गावडे (७०), मोतीबाई नरोटे (६०), वच्छला कुमोटी (५०), अनिता पदा (४०), इंदू कुमोटी (६०), जाईबाई उसेंडी (७०), विश्वनाथ पदा (६१) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर चार गंभीर जखमींना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले.
दरम्यान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी धानोरा ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली व डॉक्टरांना योग्य उपचार देण्याच्या सूचना केल्या. नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यावर सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याने हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here