खनिज संपत्ती आणि पर्यावरण

1105

देशाच्या विकासात खाणकामाचा मोठा वाटा आहे. विविध राष्ट्रांची आर्थिक प्रगती खनिजांच्या उत्पादनावर आणि वापरावर अवलंबून असते ज्यामुळे खाणकामाचा विस्तार होतो. भारतातील खनिज समृद्ध प्रदेश दीर्घ काळापासून आर्थिक विकासाचे स्त्रोत असले तरीही स्थानिक भागात खनिज उत्खनन गंभीर पर्यावरणीय आणि सामाजिक चिंता वाढविते हे सत्य नाकारता येत नाही.

देशातील बहुतांश खाणी या आदिवासी बहुल भागात आढळतात. आदिवासींचे जीवन पूर्णपणे जंगलावर अवलंबून असते. खनिजे पृथ्वीच्या उथळ आणि वरच्या भागात सापडत असल्यामुळे जंगलातील विस्तीर्ण प्रदेशातील झाडे तोडावी लागतात. ज्यामुळे जंगलाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. खाणकामाचा धोका जंगल प्रदेश, संरक्षित प्रदेश, त्यांच्या जवळील वन्य जीव यांना संभवितो. परिणामी वन्यजीव उपयुक्त वनस्पती यांच्या प्रजाती नष्ट होतात. याचा विपरीत परिणाम नैसर्गिक चक्रावर होतो. खाणकामामुळे झालेल्या पर्यावरणाचे नुकसान कायमचे व न भरून काढता येण्याजोगे असते. खाणकामासाठी डोंगर फोडल्याने वनस्पतींचे आवरण नाहीसे झाल्याने जमिनीची धूप होते व परिसराची पाणी अडविण्याची व जिरविण्याची क्षमता घटते . परिणामी प्रदेश कोरडा होत जातो. घनदाट जंगलाचा, निसर्ग संपन्न असलेला प्रदेश ओसाड पडतो.
देशात या संबंधित अनेक उदाहरण आहेत.

ओडिशा राज्यातील सुकिंदा खोऱ्यात भारतातील 97 टक्के क्रोमियमचा साठा आहे. पाणी , परिसरातील माती आणि अगदी झाडे देखील कार्सिनोजेनिक हेक्साव्हॅलेंट क्रोमियमने भरलेली आहेत. ओरिसा व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशन (ओव्हीएचए) ने उघड केले आहे की सुकिंदा येथील खाण क्षेत्रातील 84 टक्के मृत्यू आणि जवळपासच्या औद्योगिक क्षेत्रात 86 टक्के मृत्यूसाठी क्रोमियम उत्खनन जबाबदार आहे.

देशाला उत्कृष्ट कोकिंग कोळसा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या झारखंडच्या झरिया कोळशाच्या खाणीतील आग अनियंत्रितपणे जळत होती, पर्यावरणाला विषारी बनवत पाच लाखांहून अधिक लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. स्वतंत्र अभ्यासातून असे दिसून आले आहे की झरियामध्ये PM10 पातळी, एक अत्यंत धोकादायक श्वासोच्छ्वास करण्यायोग्य कण, 290 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा जास्त आहे, जे परवानगी असलेल्या एकाग्रतेच्या जवळपास तिप्पट आहे. झारखंड राज्य हे ‘संसाधनांच्या शापाचे’ उत्तम उदाहरण आहे.

कर्नाटकातील बेल्लारी जिल्हा लोह खनिज साठ्यांसाठी ओळखला जातो. लोह आणि पोलाद उद्योगासाठी लोह खनिज हा अत्यावश्यक कच्चा माल असल्याने, बेल्लारी जिल्ह्यात अनेक लोह आणि पोलाद कारखाने स्थापन झाले आहेत. होस्पेट-बेल्लारी सेक्टरमध्ये असलेल्या सुब्बारायनहल्ली लोह खनिज खाणीच्या कोर झोनमध्ये NO2, SO2, PM10 आणि PM2.5 ची सांद्रता जास्त असल्याचे पुनरावलोकन अहवालात नमूद केले आहे. बेल्लारी शहराच्या 10kms त्रिज्येच्या वेगवेगळ्या ठिकाणी PM10 पातळी 100 µg/m3 ची NAAQS मर्यादा ओलांडते. सांडूर, तोरंगल्लू आणि तारानगरच्या सभोवतालच्या पृष्ठभागावरील जलस्रोत खाण कचऱ्याने गाळलेले आणि दूषित आहेत. खाणकामाच्या दरम्यान तयार होणाऱ्या हवेतील धुळीमुळे पीक उत्पादनात घट झाली आहे.

तर देशासमोरील सध्या सर्वात मोठा मुद्दा असलेला मध्य भारतातील छत्तीसगढ राज्यातील सरगुजा जिल्ह्यातील जैवविविधतेने संपन्न असलेले “हसदेव अरण्य”. हत्तींचे प्रमुख अधिवास असलेले हे अरण्य अदानी समूहाच्या कोळसा खदानीसाठी नष्ट करण्यात येत आहे. कोळसा उत्खननाकरिता दोन फेजमध्ये या अरण्याची कटाई करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. फेज 1 च्या पहिल्या टप्प्यात 762 हेक्टर मध्ये खाणकाम करण्यात आले. उर्वरित 1,136 हेक्टरमध्ये PEKMB फेज 2 मध्ये खाणकाम सुरू आहे . ज्यामध्ये आत्तापर्यंत तीस हजार झाडे कापली गेलेली असून दहा हजार आदिवासींना त्यांच्या घरातून बेदखल करण्यात येत आहे.
देशाच्या आर्थिक विकासात खाणकामाचा कितीही मोठा वाटा असला तरी पर्यावरण जपले नाही तर या अवाढव्य विकासाची फळे चाखायला शिल्लक तरी राहू काय ? असा प्रश्न उपस्थित होतो?

– स्वाधीनता बाळेकरमकर
गडचिरोली
८९७५१३४७४८

©©©

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here