मराठी नामफलक बंधनकारक : गडचिरोलीत १ ऑक्टोबरपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात

198

मराठी नामफलक बंधनकारक : गडचिरोलीत १ ऑक्टोबरपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात
– ३० सप्टेंबर पर्यंत मराठी फलक लावण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि.२५ : गडचिरोली नगर परिषद कार्यक्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेत असणे सक्तीचे करण्यात आले आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (रोजगार आणि सेवा शर्तीचे नियमन) कायदा २०१७, मा. उच्च न्यायालयाचा २३ फेब्रुवारी २०२२ रोजीचा निर्णय तसेच महाराष्ट्र शासन राजपत्रातील दि. २२ फेब्रुवारी २०२३ च्या आदेशान्वये ही अट लागू करण्यात आली आहे.
नगरपालिकेने व्यापाऱ्यांना याबाबत यापूर्वीच नोटिसा व जाहिर आवाहन केले होते. मात्र अद्यापही अनेक आस्थापनांवर नामफलक मराठीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता ३० सप्टेंबर २०२५ ही अंतिम मुदत ठरविण्यात आली असून, त्यानंतर म्हणजेच १ ऑक्टोबरपासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदेकडून देण्यात आली.
कारवाईअंतर्गत प्रत्येक नियमभंग करणाऱ्या आस्थापनाला रु. २,००० दंड ठोठावला जाणार असून, दंड आकारल्यानंतर नामफलक दुरुस्तीसाठी केवळ ५ दिवसांची मुदत दिली जाईल. तरीदेखील दुरुस्ती न केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
मराठी नामफलकासोबत इतर भाषेतील फलक लावण्यास मनाई नाही. परंतु, त्यावर मराठी मजकूर सुरुवातीलाच असावा आणि मराठीतील अक्षरे इतर भाषेपेक्षा लहान नसावीत, अशी अट अधिनियमात स्पष्ट करण्यात आली आहे.
नगर परिषदेकडून व्यापारी, दुकानदार, हॉटेल्स व विविध आस्थापनांना पुन्हा आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी तातडीने आपले नामफलक मराठीतच ठळकपणे लावावेत. अन्यथा दंड व कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #MarathiSignboards #Gadchiroli #MunicipalOrder #Fines #MandatoryMarathi #HighCourtOrder #ShopAct2017 #LocalNews #LanguagePolicy #Maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here