– सामाजिक उपक्रमांची भरघोस मेजवानी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : गडचिरोली शहरातील आरमोरी मार्गावरील लोकमान्य गणेश मंडळ दरवर्षी धार्मिकतेसोबत सामाजिक भान जोपासणाऱ्या उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. यंदा मंडळाने भाविकांसाठी शिर्डीच्या साईबाबांचा अप्रतिम देखावा सादर केला असून तो नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
मंडळाकडून दरवर्षीप्रमाणेच यंदाही सामाजिक थोर नेत्यांचे जीवनकार्यपट जनजागृती, पर्यावरणपूरक मूर्ती, रक्तदान शिबीर, शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून प्रशासन व राज्य शासनही मंडळाच्या कार्याची दखल घेत असते.
या मंडळाकडून गणेशोत्सव काळात दररोज आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांना एक आगळीवेगळी मेजवानी अनुभवायला मिळत आहे.
कार्यक्रमांचा तपशील –
२७ ऑगस्ट : श्री. गणेश मूर्तीची स्थापना (दुपारी २.३० वा.), संध्याकाळी ५ वाजता शिर्डीचे साईबाबा देखाव्याचे दर्शन प्रारंभ. रात्री आरतीनंतर भजन.
२८ व २९ ऑगस्ट : मुलं-मुली, महिला व पुरुषांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन.
३० ऑगस्ट : वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट व फळवाटप.
३१ ऑगस्ट : शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा (इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत).
१ सप्टेंबर : रक्तदान शिबीर.
२ सप्टेंबर : शहरातील स्वच्छता अभियान.
३ सप्टेंबर : वृक्षारोपण.
४ सप्टेंबर : संध्याकाळी ६ वाजता श्री गणेशाची महाआरती, त्यानंतर जगराता व महाप्रसाद.
५ सप्टेंबर : दुपारी १२ वा. अनंत चतुर्दशीची विशेष पूजा व भजन. सायं. ४ वा. यात्रेतून विसर्जन मिरवणूक.
लोकमान्य गणेश मंडळ हे जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित मंडळ मानले जाते. यापूर्वी राज्य शासनाकडून मंडळाला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कारही मिळालेला आहे. सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी ओळखले जाणारे हे मंडळ दरवर्षी गणेशोत्सव काळात आदर्शवत उपक्रम राबवून इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
भाविक भक्तांनी व नागरिकांनी या देखाव्याचा तसेच विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gadchiroli #LokmanyaGaneshMandal #SaiBabaTheme #Ganeshotsav2025 #SocialInitiatives #EcoFriendlyIdol #BloodDonationCamp #TreePlantation #CleanlinessDrive #CulturalPrograms #गडचिरोली #लोकमान्यगणेशमंडळ #साईबाबादेखावा #गणेशोत्सव२०२५ #सामाजिकउपक्रम #पर्यावरणपूरकमूर्ती #रक्तदानशिबीर #वृक्षारोपण #स्वच्छताअभियान #सांस्कृतिककार्यक्रम













