ढेकणी गावात दोन वर्षांपासून दारूबंदी कायम

29

– ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : चामोर्शी तालुक्यातील ढेकणी गावाला दारूमुक्त करण्यात ग्रामस्थ, गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूला यश आले आहे. आता जवळपास दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही दारूबंदी कायम आहे. ग्रामस्थांनी केलेल्या यशस्वी प्रयत्नांपासून इतरही गावांना प्रेरणा मिळावी, यासाठी ग्रामस्थांनी दारूबंदीचा विजयस्तंभ देखील उभारला आहे.
ढेकणी या गावात अवैध दारूविक्री सुरु होती तेव्हा ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या गावातील दारूविक्री थांबविण्यासाठी काही लोकांनी पुढाकार घेतला. मुक्तिपथ तालुका चमूने या गावाला भेट देऊन अवैध व्यवसायांमुळे गावाचे होणारे नुकसान पटवून दिले. तसेच दारूविर्क्रेत्यांविरोधात लढा देण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित केले. मुक्तिपथचे तालुका संघटक आनंद इंगळे व उपसंघटक आनंद सिडाम यांनी वेळोवेळी गावातील लोकांना मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत दारूबंदीचा निर्णय घेतला.
ढेकणी हे गाव आता गेल्या दोन वर्षांपासून दारूविक्री मुक्त गाव आहे. या गावातुन अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी दारूविक्रेत्यांना वारंवार नोटीस देणे, दारूविक्रीचा व्यवसाय बंद करण्यासंदर्भातील हमीपत्र लिहून घेण्यात आले. तसेच कायम दारूमुक्त गाव राहावे, शांतता टिकून राहावी, यासाठी ग्रामस्थांनी एकमताने दारूबंदीचा ठराव घेऊन जो कोणी दारू विक्री करणार त्याला ५ हजार रुपये व एक बोकड अशा स्वरूपातील दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. अशा विविध उपायोजना करून गावातून अवैध दारू हद्दपार करण्यात आली.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #muktipath )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here