प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सोडे खरेदी केंद्रावर धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी

130

– हजारो क्विंटल धान्य उघड्यावर; ताडपत्रीवर शासनाचे कोट्यवधी रुपये धोक्यात
The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. २९ : गडचिरोली जिल्ह्यातील सोडे येथील धान खरेदी केंद्रावर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हजारो क्विंटल धान्य उघड्यावर पडून राहिले असून पावसामुळे त्याची प्रचंड नासाडी होत आहे. शासनाचे कोट्यवधी रुपये या निष्काळजीपणामुळे पाण्यात जात असतानाही जबाबदार अधिकारी, संस्था व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत 2024-25 या खरीप हंगामात सोडे केंद्रावर तब्बल 14,100 क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली. त्यापैकी केवळ 4,000 क्विंटल धान्याचीच भरडाईसाठी उचल झाली, तर उर्वरित 10,000 क्विंटलपेक्षा जास्त धान्य गेल्या सहा महिन्यांपासून खरेदी केंद्रावरच पडून आहे. गोदामाअभावी हे धान्य फक्त ताडपत्रीवर अवलंबून आहे.
दरवर्षीच अशा प्रकारे धान्य भिजून, काळवंडून, उंदरांच्या उपद्रवामुळे व कोंब फुटल्याने खराब होत असते. शेवटी हेच धान कवडीमोल भावाने लिलावात विकले जाते आणि शासनाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसतो. तरीही याबाबत ठोस उपाययोजना होत नाही, ही बाब संतापजनक आहे.
शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धान्याची वेळेत भरडाई न होणे, गोदामाची व्यवस्था नसणे, तसेच प्रशासन आणि मिल मालक यांचा निष्काळजीपणा यामुळे दरवर्षी धान्य वाया जाते. यामागे मोठा भ्रष्टाचार असल्याचा संशयही ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here