कुरखेडा : वडेगांव गटग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व एका सदस्याचे सदस्यत्व रद्द

642

– ग्रामपंचायतवर प्रशासक राज येण्याची शक्यता
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा , ७ मार्च : तालुका विविध समस्येने जर्जर असून आता ग्रामपंचायत कामाचा मोबदला उचल करण्यात तसेच त्यांच्या कुटूंबाचे हितसंबंध असल्याच्या आरोपावरून जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या विविध कलमान्वये तालुक्यातील वडेगांव गटग्रामपंचायत येथील सरपंच, उपसरपंच व एका सदस्याचे सदस्यत्व रद्द केले आहे. त्यामुळे आता या ग्रामपंचायतवर प्रशासक राज येण्याची शक्यता निर्माण झाली असून तालुक्यात एकचं खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील वडेगाव गट ग्रामपंचायत कार्यालयात ११ सदस्यांचे कार्यकारी मंडळ आहे. तर सरपंच पदावर जमना जमकातन व उपसरपंच पदावर भाग्यवान जनबंधू आहेत. येथील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय कोरेटी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सरपंच जमना जमकातन यांचे पती सरपंच पदावर कार्यरत असताना ग्रामपंचायतच्या सार्वजनिक विहिरीच्या गाळ उपसा कामावर मजूर म्हणून काम करीत त्याचा मोबदला उचलला. तसेच एप्रिल २०२१ ची मासिक सभा कोरम अभावी तहकूब झाल्याने ती त्याच महिन्यात घेणे बंधनकारक असताना ती घेण्यास कसूर केला असा आरोप करीत तक्रार दाखल केली. तर उपसरपंच भाग्यवान जनबंधू यांच्या वडिलांच्या नावावर असलेला ट्रॅक्टर जून २०२१ मध्ये ग्रामपंचायतच्या कचरा कुंडीतील कचरा उचल करण्याच्या कामावर लावून त्याचा मोबदला म्हणून १३ हजार रूपये घेण्यात आले. तसेच सार्वजनिक हातपंपावर इलेक्ट्रिक मोटर बसवू त्याचा वापर करीत असल्याचा आरोप तक्रारीत केला. तसेच ग्रामपंचायत सदस्य रजनी बंसोड यांच्या पतीच्या नावावर असलेला ट्रॅक्टर जून २०२१ मध्ये ग्रापंच्या कचरा कुंडीतील मलमा सफाईच्या कामावर लावून त्याचा मोबदला म्हणून १४ हजार रुपयांची उचल केल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे संजय कोरेटी यांनी केली होती. जिल्हाधिकारी यांच्या दालनात दोन्ही गटाची बाजू ऐकून घेत सूनावनी करताना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी तक्रारदाराची तक्रार ग्राह्य धरत विद्यमान सरपंच जमकातन, उपसरपंच जनबंधू व सदस्य बंसोड यांच्या विरोधात ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मुंबई अधिनियम क्र ३ चे कलम १४ (१) (ग) अन्वये कार्यवाही करून त्यांचे सदस्यत्व रद्द केले. सदर कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून. एकाच वेळी सरपंच, उपसरपंच व एक सदस्याचे पद रद्द झाल्याने प्रशासक राज निर्माण होण्याची शक्यता आहे‌. तर सूत्रानुसार तालुक्यात पुन्हा एका ग्रामपंचायती वर अशाप्रकारची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli news updates) (The gdv) (kurkheda) (wadegao)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here