कुरखेडा : ऑनलाईन ७/१२ साठी ५०० रुपयांची लाच, महिला तलाठी रंगेहात अटकेत
– महसूल विभागात खळबळ
The गडविश्व
ता. प्र. / कुरखेडा, दि. २७ : ऑनलाईन ७/१२ काढून सही-शिक्क्यासह प्रत देण्यासाठी ५०० रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव (साजा) येथील महिला तलाठी सुलोचना विठ्ठलराव कन्नाके (वय ३८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ने २६ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे संपूर्ण महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
तक्रारदार शेतकऱ्यांनी त्यांच्या नावावरील वनपट्ट्याच्या शेतजमिनीचा ७/१२ ऑनलाईन करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर ग्राम महसूल कार्यालय, गोठणगाव येथे ऑनलाईन ७/१२ सही-शिक्क्यासह प्रत मागितली असता तलाठी कन्नाके यांनी त्यासाठी ५०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्यास स्पष्ट नकार देत तक्रारदाराने तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक विकांत सगणे यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील असलेल्या गोठणगाव परिसरात २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पंचासह गोपनीयरीत्या शहानिशा करण्यात आली. शहानिशीदरम्यान तलाठी कन्नाके यांनी ५०० रुपयांची मागणी करून २६ फेब्रुवारी रोजी लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर सापळा रचण्यात आला असता, राहत्या घरी ५०० रुपये स्वीकारताना तलाठी कन्नाके रंगेहात सापडल्या. त्यांच्याविरुद्ध कुरखेडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
#thegdv #thegadvisva #gadchirolinews #ACBAction #TalathiArrested #Bribery #CorruptionExposed #RevenueDepartment #FarmersRights #Kurkhda #Maharashtra














