महावितरणच्या सौर निर्णयाविरोधात गडचिरोलीत संताप ; निवेदनातून निर्बंध हटवण्याची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : महावितरणने निवासी सौर ग्राहकांसाठी लागू केलेल्या नव्या धोरणामुळे राज्यभरात असंतोषाची लाट उसळली असून, या निर्णयाविरोधात गडचिरोली येथे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सौर विक्रेते, ऊर्जा क्षेत्रातील प्रतिनिधी व जागरूक नागरिकांच्या वतीने MSEDCLच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून सौर क्षमतेवरील निर्बंध तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १३ फेब्रुवारीपासून पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत ग्राहकांच्या सौर क्षमतेसाठी मागील १२ महिन्यांच्या सरासरी वीज वापराच्या आधारे मर्यादा लादण्यात आली आहे. यापूर्वी ग्राहकांना त्यांच्या सध्याच्या तसेच भविष्यातील विजेच्या गरजेनुसार सौर क्षमतेची निवड करण्याची मुभा होती. मात्र या अचानक बदलामुळे महाराष्ट्रातील सुमारे ५० ते ६० टक्के निवासी सौर ग्राहकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला.
दरम्यान या धोरणात्मक बदलाबाबत कोणतेही अधिकृत परिपत्रक, अधिसूचना अथवा उद्योग सल्लामसलत न करता थेट ऑनलाइन पोर्टलवर नियम लागू करण्यात आल्याचा गंभीर आक्षेप निवेदनात नोंदवण्यात आला. त्यामुळे आधीच नोंदवलेल्या सौर ऑर्डर्स रद्द होण्याची किंवा कमी क्षमतेत मर्यादित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवीन बांधलेल्या घरांमध्ये वीज वापराचा इतिहास कमी असल्याने अशा ग्राहकांना अत्यल्प सौर क्षमता मंजूर होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत अनेक मीटर्सचा एकत्रित वापर विचारात न घेता केवळ एका मीटरच्या मागील वापरावर सौर क्षमता निश्चित केली जात असल्याने मोठ्या सोसायट्यांनाही मोठा आर्थिक व नियोजनात्मक फटका बसत असल्याचे नमूद करण्यात आले.
पीएम सूर्यघर योजनेच्या उद्दिष्टांवर प्रश्नचिन्ह
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी PM Surya Ghar Yojana निवासी सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी राबवली जात आहे. मात्र महावितरणच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात सौर ऊर्जेचा स्वीकार मंदावेल आणि योजनेच्या उद्दिष्टांनाच धक्का बसेल, अशी तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली.
ग्राहकांना त्यांच्या प्रत्यक्ष तसेच भविष्यातील विजेच्या गरजेनुसार सौर क्षमतेची निवड करू द्यावी, मागील १२ महिन्यांच्या वापरावर आधारित मर्यादा रद्द करावी आणि ऑटो लोड एक्स्टेंशनची सुविधा पुन्हा सुरू करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #pmsuryghar














